प्रादेशिक चित्रपटनिर्मितीवर जास्त भर देणार
निवडक आशयघन हिंदी चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (एनएफडीसी) मराठी चित्रपटनिर्मितीतही पुढाकार घेतला आहे. याआधी ‘एनएफडीसी’ने काही मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती, मात्र त्याला बराच काळ लोटला आहे. आता पुन्हा एकदा प्रादेशिक चित्रपटनिर्मितीकडे ‘एनएफडीसी’ने आपला मोर्चा वळवला असून त्याअंतर्गत ‘२० म्हंजे २०’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण खात्याकडून १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी काही निधी देण्यात आला आहे. त्यानुसार सध्या विविध प्रादेशिक भाषांतील चित्रपटांच्या पटकथा निवडून त्यांना निर्मितीसाठी अर्थसाहाय्य करण्याचे काम एनएफडीसी करते आहे. उदय भंडारकर दिग्दर्शित ‘२० म्हंजे २०’ या मराठी चित्रपटाची निवड या योजनेंतर्गत झाली आहे, अशी माहिती एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक नीना लाथ गुप्ता यांनी दिली. एनएफडीसीची एक निवड प्रक्रिया आहे. आमच्याकडे पटकथा आल्यानंतर त्यात सामाजिक आशय, संदर्भ किती आहे, त्याचे महत्त्व, वेगळेपण काय, या सगळ्या गोष्टी तपासून त्यानंतर समिती चित्रपटाची निवड करते. ‘२० म्हंजे २०’ या चित्रपटात सामाजिक संदेश आहे, मात्र तो कुठेही संदेशात्मक चित्रपट न होता मनोरंजनात्मक पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आली आहे. शहरातील तरुणी आपल्या वडिलांची गावात शाळा बांधण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गावात येते आणि मग तिच्या अनुषंगाने आजच्या शिक्षण व्यवस्थेवर दिग्दर्शकाने भाष्य केले आहे. या चित्रपटाची पटकथाच इतकी सशक्त असल्याने निवड समितीला हा चित्रपट आवडला, असेही त्यांनी सांगितले.
आधुनिक शिक्षणाच्या रेटय़ात शासकीय किंवा सरकारी शाळांची वेगाने घटत जाणारी संख्या हा केवळ राज्यापुरता चिंतेचा विषय राहिलेला नाही. देशभरात शासकीय शाळांची संख्या अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरलेली आहे. किमान प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे.
मात्र या शाळाच बंद पडत चालल्याने कित्येक विद्यार्थी हा अधिकार गमावून बसणार आहेत, यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. या चित्रपटाबरोबरच ‘गंगूबाई’ आणि पार्थो घोष दिग्दर्शित ‘अरुणोदय’ या प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती एनएफडीसी करत असल्याचे नीना लाथ गुप्ता यांनी सांगितले. ‘२० म्हंजे २०’मध्ये मृण्मयी गोडबोले, अरुण नलावडे, राजन भिसे यांच्यासह ‘भूतनाथ’फे म पार्थ भालेराव, ‘दृश्यम’फे म मृणाल जाधव, अश्मित पठारे, मोहित गोखले, साहिल कोकाटे या बालकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर ‘किल्ला’चे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे छायादिग्दर्शन केले आहे.
‘एनएफडीसी’चा मराठी चित्रपट ‘२० म्हंजे २०’
‘एनएफडीसी’ने आपला मोर्चा वळवला असून त्याअंतर्गत ‘२० म्हंजे २०’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 24-05-2016 at 05:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nfdc to produce marathi movie