अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस काही महिन्यांपूर्वीच आई- बाबा झाले. जानेवारी २०२२ मध्ये निक- प्रियांकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलगी मालतीचा जन्म झाल्याची घोषणा केली होती. मात्र जन्मानंतर ती जवळपास १०० दिवस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात होती. पण मालती रुग्णालयातून घरी परतल्यानंतर प्रियांका आणि निक फॅमिली टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत. १९ जूनला फादर्स डेच्या निमित्तानं निक जोनस आणि प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली.
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर निक जोनससाठी खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने निक आणि मालतीचा एक गोड फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये निक मालतीचे हात हातात पकडून तिला उभं करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अर्थात याआधीच्या फोटोंप्रमाणे या फोटोमध्येही प्रियांकाच्या लेकीचा चेहरा दिसत नाही आहे. प्रियांकानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘फादर्स डेच्या शुभेच्छा. आपल्या लहान मुलीसोबत तुला पाहणं मला खूप आनंद देतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आगामी काळातही ते असंच बहरत जावो.’
याशिवाय हाच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना निक जोनसनं देखील खास पोस्ट लिहिली आहे. मालतीसोबतचा फोटो शेअर करताना निकनं लिहिलं, “माझ्या मुलीसोबत पहिला फादर्स डे. धन्यवाद प्रियांका चोप्रा या शूजसाठी आणि मला बाबा होण्याचा आनंद देण्यासाठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. फादर्स डेच्या सर्वांना शुभेच्छा.” निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
दरम्यान जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्राच्या मुलीची प्रीमॅच्युअर डिलव्हरी झाली होती. त्यानंतर तिला तब्बल १०० दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. प्रियांका आणि निक यांनी ८ मे म्हणजेच मदर्स डेच्या दिवशी त्यांच्या मुलीला घकी आणलं होतं. त्या दिवशी त्यांनी घरी एक पुजा देखील ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं मुलगी मालती आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबतचा ३ पिढ्यांचा फोटो शेअर केला होता. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.