कधी तो एखाद्या जाहिरातीत सलमान खानच्या मागे उभा असूनही ठळकपणे लक्षात राहणारा चेहरा असतो. ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘तेरे बिन लादेन’सारख्या हिंदी चित्रपटांतही दिसतो आणि मराठीत तर ‘व्हेंटिलेटर’, ‘नारबाची वाडी’पासून ‘कु लकर्णी चौकातला देशपांडे’सारख्या आशयवैविध्य असलेल्या चित्रपटात तो असतो. दुसरीकडे ‘माझा होशील ना’ या मालिके त पिंटय़ा मामाच्या भूमिके तही त्याने बहार उडवून दिली आहे. भूमिका कोणतीही असो ती मनापासून करण्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे आणि हे मी अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकलो आहे, असे म्हणणारा अभिनेता निखिल रत्नपारखी पुन्हा एकदा ‘इमेल फीमेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडय़ात प्रदर्शित होणारा हा चित्रपट करोनाकाळानंतर प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक आहे. इतक्या दिवसांनंतर एकाचवेळी मनोरंजन करणाऱ्या आणि हलक्याफु लक्या पद्धतीने एका गंभीर विषयाची जाणीव करून देणाऱ्या या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचा आनंद आहे, असे तो सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ईमेल फिमेल’ या योगेश जाधव दिग्दर्शित चित्रपटात निखिल रत्नपारखी मुख्य भूमिकेत आहे. निखिल वगळता अन्य कलाकार हे तुलनेने नवीन आहेत. मात्र अशा वेळी अमिताभ बच्चन यांची हमखास आठवण येते असं तो सांगतो. अमिताभ बच्चन सेटवर असलेल्या इतर कलाकारांना मोकळं करतात, त्यांच्या मोकळ्याढाकळ्या वावरण्यातून-संवादातून ते इतरांचं अवघडलेपण दूर करतात. त्यामुळे सेटवर एक खेळकर वातावरण तयार होतं. मुळात तुम्ही जी भूमिका करत आहात तिचा तुम्हालाच मनापासून आनंद घेता आला पाहिजे, मग तो इतरांपर्यंतही पोहोचतो, असे निखिल सांगतो. ‘ईमेल फिमेल’ या चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यानंतर हा निखळ मनोरंजक चित्रपट म्हणता येणार नाही. मात्र हा सेक्स कॉमेडी प्रकारातील चित्रपट वाटत असला तरी त्यातून मांडलेला विषय हा गंभीर आहे, याकडे त्याने लक्ष वेधले. मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या या पसाऱ्यात एखाद्या व्यक्तीला ईमेल किं वा अन्य माध्यमातून सहजपणे कु ठल्याही प्रकरणात अडकवलं जातं. लोक सध्या मोबाइल आणि इन्स्टा-फे सबुकसारख्या समाजमाध्यमांमध्ये इतके  गुंतलेले आहेत की त्याचा गैरफायदा घेत अनेक पद्धतीने त्यांची फसवणूक के ली जाते. आपल्याला अडकवलं जातं आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही आणि जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. या चित्रपटातील मध्यमवयीन नायकाच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकजण स्वत:ला जोडून घेऊ शके ल, असा विषय असल्यानेच या चित्रपटातील भूमिके ला होकार दिल्याचे निखिलने सांगितले.

मोबाइल आणि इंटरनेटचे हे वेड आता मालिका-चित्रपटांच्या सेटवरही पोहोचले असल्याबद्दल त्याने खंत व्यक्त के ली. सध्या सेटवर स्पॉटबॉयपासून कलाकारांपर्यंत आताच्या पिढीतील जी मुलं आहेत ती सतत मोबाइलवरच अडकलेली असतात. कॅ मेरा रोल म्हणेपर्यंत मोबाइल नजरेसमोर असतो. आजच्या पिढीला हे व्यसनच लागलं आहे, यातून प्रत्यक्षातला संवादच हरवत चालला असल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. सध्या चित्रपट-मालिका-वेबमालिका असे अनेक पर्याय कलाकारांसमोर आहेत. त्यांना खूपशा संधी उपलब्ध आहेत. माध्यम कु ठलेही असो मला कथा जास्त महत्त्वाची वाटते. या कथेतून आपण लोकांना काय देऊ शकतो, त्यांच्यापर्यंत काय पोहोचवू शकतो, याचा विचार करूनच मी भूमिका स्वीकारतो, असे त्याने सांगितले. मात्र खरोखरच ओटीटी माध्यमांमुळे कलाकारांना खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असेही तो मनमोकळेपणाने सांगतो.

‘माझा होशील ना’ या मालिके तील भूमिके बद्दल बोलतानाही प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडली आहे, याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. या मालिके तील आम्ही ‘मामा’ मंडळी प्रत्यक्षातही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे मालिके च्या सेटवर आम्ही एकत्र धमाल करत असतो. आमच्यात परस्परांमध्ये जे नातं आहे त्याचंच प्रतिबिंब पडद्यावरही उमटलं आहे. या मालिकेत सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्यानेच ती लोकप्रिय ठरली आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.

एकीकडे ओटीटी माध्यमांनी कलाकारांसाठी अभिनयाची संधी निर्माण केली आहे, प्रेक्षकांना उत्तम आशय घरबसल्या उपलब्ध करून दिला आहे. हे वास्तव असलं तरी या माध्यमावर काही एक निर्बंध असायला हवेत. सध्या मोबाइलवरूनच ओटीटीवरचा आशय प्रामुख्याने पाहिला जातो आणि घराघरांत मुलांच्या हातात मोबाइल असल्याने त्यांनी काय पहावे-काय पाहू नये, यावर पालकांचं नियंत्रण राहिलेलं नाही. त्यांच्या वयाला साजेसा नसलेला आशय, गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात हे चुकीचे असल्याने ओटीटी माध्यमावरील आशयावर काही बंधनं घालायला हवीत.

– निखिल रत्नपारखी

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikhil ratnaparkhi an artist with a grip on the media abn
Show comments