झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. लोकप्रियतेच्या बाबतीत उच्चांक गाठलेल्या या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनेता सुबोध भावे, नवोदित अभिनेत्री गायत्री दातार आणि तिच्या आईच्या भूमिकेतील गार्गी फुले थत्ते यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. मालिकेत ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची होती. ही भूमिका साकारलेली गार्गी फुले थत्ते यांनी. गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. सुरुवातीला गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’ मालिकेतील भूमिका नाकारली होती.
वडील निळू फुले यांनी अभिनयाची दिलेली एक शिकवण कायम लक्षात ठेवत असल्याचं गार्गी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ”बाबांची एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ते मला सांगायचे, जेव्हा तू कॅमेरासमोर जाशील तेव्हा तू स्वत: अमिताभ बच्चन आहेस असंच समज. तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असला तरी तुझं अभिनय दमदारच असलं पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलं होतं. हीच गोष्ट आयुष्यात नेहमीच कॅमेरासमोर असताना डोक्यात घोळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पाहा फोटो : आजच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असे अश्विनी भावेंचे सौंदर्य
‘तुला पाहते रे’ मालिकेतील भूमिकेविषयी त्या म्हणाल्या होत्या, ”कट्टी बट्टी’ या मालिकेमुळे मी आधी सौ. निमकर ही भूमिका नाकारली होती. पण निर्माते माझ्यासाठी थांबले आणि माझ्या पदरात सोनं पडलं. माझी भूमिका लोकांना आवडली हीच माझ्या कामाच्या पोचपावती आहे.’