Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झालेली आहे. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. मार्च महिन्यात या दोघांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला होता. यानंतर या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये क्रुझवर आयोजित करण्यात आला होता. यानंतर आता अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. अंबानींच्या घरी नुकतंच ‘मामेरु’ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत-राधिकाच्या लग्नाआधी मामेरु समारंभासाठी अंबानींच्या घरी जय्यत तयारी करण्यात आली होती. या समारंभामध्ये वधू आणि वराचे मामा आपल्या भाच्यांसाठी, बहिणी व भावोजींसाठी साडी, कपडे, दागिने, बांगड्या या भेटवस्तू घेऊन येत असतात. या समारंभासाठी संपूर्ण अँटालिया परिसर सजवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी जान्हवी कपूर व तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया, ओरी, रश्मी ठाकरे व त्यांचे चिरंजीव तेजस ठाकरे या सगळ्यांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : ठरलं तर मग : पूर्णा आजीने सायलीचा केला स्वीकार! अखेर ‘तो’ भावनिक क्षण आलाच, नातसुनेवर सोपवली मोठी जबाबदारी

आता येत्या १२ ते १४ जुलैदरम्यान अनंत-राधिकाचा भव्य लग्नसोहळा मुंबईतील बीकेसी येथे पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मामेरु समारंभात नीता अंबानींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. थीमनुसार लाडक्या लेकाच्या लग्नात त्यांनी गुलाबी रंगाची गुजराती स्टाइल बांधणी साडी नेसली होती. भरजरी बांधणी साडी, मोकळे केस, लाइट मेकअप, गळ्यात मोठा हार या लूकमध्ये वयाच्या साठीतही नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या.

नीता अंबानींनी घरी आलेल्या पाहुण्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. यावेळी त्यांच्या ८५ वर्षीय आई पूर्णिमा दलाल देखील उपस्थित होत्या. नीता यांनी आईचं औक्षण करून तिला मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला. नीता यांच्या बांधणी साडीवर सोन्याच्या जरीने सुंदर असं वर्क केलेलं आहे. या संपूर्ण लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नीता अंबानी व त्यांच्या सुनांनी गुजराती परंपरेनुसार ‘बांधणी’ साड्यांची थीम या मामेरु समारंभासाठी नियोजित केली होती.

हेही वाचा : अंबानींच्या ‘बांधणी’ ट्रेंडमध्ये सुंदर पैठणी नेसून पोहोचल्या रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंचीही ‘मामेरू’ समारंभाला हजेरी, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नीता अंबानींच्या सगळ्याच साड्या या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वी सामुहिक विवाहसोहळ्यात त्यांनी नेसलेल्या साडीवर मंत्र लिहिलेला होता. त्यामुळे या दोन्ही समारंभात परंपरा जपत हटके साड्या नेसणाऱ्या नीता अंबानी आता लेकाच्या लग्नात कसा लूक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani gujarati bandhani saree grab attention at anant radhika mameru ceremony sva 00