Nita Ambani Jamewar Saree : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच त्यांच्या हटके स्टाइलमुळे चर्चेत असतात. कोणत्याही कार्यक्रमाला त्या नवनवीन भारतीय परंपरेला साजेशा अशा साड्या नेसण्यास प्राधान्य देतात. मुकेश व नीता अंबानी हे दोघंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर पार पडलेल्या डिनर पार्टीला उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टिला जाताना नीता अंबानी यांनी खास साडी नेसली होती. या साडीची सध्या सर्वत्र चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नीता अंबानी यांनी नेसलेली साडी सेलिब्रिटी डिझायनर तरुण ताहिलियानीच्या कलेक्शनमधली खास साडी आहे.
तरुण ताहिलियानीने नीता अंबानींचे फोटो शेअर करत या साडीबद्दल स्वत: माहिती दिली आहे. ही साडी विणण्यासाठी तब्बल १९०० तास लागल्याचं या डिझायनरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तरुण ताहिलियानी सांगतो, “नीता अंबानी यांची साडी विणण्यासाठी १९०० तासांहून अधिक वेळ लागला आहे, तसेच यामध्ये फ्रेंच नॉटसह क्लासिक आरी वर्क करण्यात आलं आहे. या साडीवर नीता अंबानी यांनी मॉडर्न कॉलरचा ब्लाऊज घातला आहे. या ब्लाऊजवर एक खास ब्रोच आहे. हा मध्यभागी असलेला ब्रोच रॉयल लूक देतो.” या लूकमध्ये नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या.
सुंदर साडी, त्यावर दागिन्यांची उत्कृष्ट रचना यामुळे नीता अंबानींच्या लूकला पूर्णत्व आलं आहे. जमेवार/जामावार हा पर्शियन शब्द असून याचा अर्थ फुलांनी सजवलेला कपडा असा होतो. नावाप्रमाणेच नीता अंबानींच्या साडीवर असलेली नाजूक फुलांची डिझाइन सर्वांचं लक्ष वेधून घेते. जमेवार साड्या या प्रामुख्याने काश्मिरमध्ये विणल्या जातात. १९०० तास म्हणजेच जवळपास ८० दिवसांहून अधिक काळ काम करून ही साडी तयार करण्यात आली आहे.
नीता अंबानींच्या साडीवर हेवी वर्क केल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. यावर मोत्याचे सुंदर कानातले, हातात ब्रेसलेट अन् अंगठी या लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. नीता अंबानींची ही साडी अन् हा रॉयल लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.