Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत-राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
अनंत-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाच्या गाण्याने झाली. दुसऱ्या दिवशी बॉलीवूड कलाकारांनी आपल्या डान्सने सगळ्यांना थिरकायला लावले. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंबानी कुटुंब व सगळे पाहुणे पारंपरिक लूकमध्ये दिसून आले. या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते नीता अंबानी यांनी.
नीता अंबानी आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक वस्तूची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये असते. अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही नीता अंबानी यांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनंत व राधिकाच्या हस्ताक्षर सेरेमनीमध्ये नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली चंदेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती व गळ्यात हिरव्या रंगाच्या पन्ना हिऱ्याचा हार घातला होता. नीता अंबानी यांच्या गळ्यातील हारची किंमत जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जगभरातील जवळपास एक हजारपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यााठी जामनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.