बॉलीवूडमधील ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. ते कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते आणि त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच नितीन देसाई यांची मुलगी मानसीने कुटुंबियांची बाजू मांडली आहे. “माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं. माझ्या वडिलांचा कधीच, कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. माझ्या बाबांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं.” असं मानसीने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही वसुलीसाठी कधीही…”, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण

एएनआयला दिलेल्या मुलाखातीत मानसी म्हणाली, “मी मानसी चंद्रकांत देसाई, ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मोठी मुलगी. मी माझी आई आणि कुटुंबातर्फे हे स्टेटमेंट देत आहे की माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई आम्हाला २ ऑगस्ट २०२३ रोजी सोडून गेले. त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे स्टेटमेंट देण्याचा हाच हेतू आहे की ही दुःखद घटना घडल्यानंतर त्यांच्याबद्दल कर्ज बुडवण्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही बाबांची बाजू आणि त्यांच्याबरोबर जे घडलं तेच माध्यमांना सांगायचा प्रयत्न करत आहोत.”

Video: नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना पत्नी व मुलांना कोसळलं रडू, आमिर खानने कुटुंबाला दिला धीर

कर्जाचा आकडा सांगत ती पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यापैकी ८६.३ कोटी रुपयांची परतफेड आम्ही फेब्रुवारी २०२० पर्यंत केली होती. नंतर करोना आल्याने पूर्ण जग थांबलं, बॉलीवूडलाही त्याचा फटका बसला. बाबाकडे काम नव्हतं म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला, त्यामुळे पेमेंट्स देण्यात उशीर झाला, नियमित होऊ शकले नाहीत. त्याआधी लोन देणाऱ्या कंपनीने आमच्याकडून सहा महिन्यांचे अॅडव्हान्स पेमेंट मागितले होते. त्यावेळी माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतरही कुणालाच फसवायचा बाबांचा हेतू नव्हता.”

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

“त्यांनी गेली दोन वर्षे लोन देणाऱ्या कंपनीबरोबर मीटिंग्स करून लोन सेटलमेंट करण्यासाठी किंवा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून ते कर्ज फेडू शकतील. कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते कर्ज फेडण्यात त्यांची मदत करतील. पण दुसरीकडे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. गुंतवणूकदार बाबांची मदत करायला तयार होते. पण कंपनीने त्यांना मदत करू दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की बाबांबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये. माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका,” असं मानसी म्हणाली.

यावेळी तिने राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. तसेच तिच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांचा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin desai daughter mansi desai first reaction about loan nd studio asks state govt for justice hrc
Show comments