Bhagya Dile Tu Mala Ganpati Special: गणरायाच्या आगमनाने सारी सृष्टी दुमदुमली आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. कलाकार मंडळींचं दुसरं घर म्हणजेच अनेक मालिकांच्या सेटवर सुद्धा गणपती स्पेशल कथानक सुरु आहे. एकूणच मालिकाविश्वातही बाप्पाचा गजर सुरु आहे. सेटवर बाप्पा आल्याने कलाकारांचा उत्साह सुद्धा द्विगुणित झाला आहे. गणरायाच्या पाहुणचाराची सुद्धा बरोबर सोय करण्यात हे कलाकार गुंतले आहेत. असाच एक खास भाग सध्या कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सुद्धा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे मालिकेतील बाप्पासाठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्वतःच्या हाताने मोदक बनवले होते. याविषयी सांगताना मालिकेतील राजवर्धन म्हणजेच विवेक सांगळेने एक खास किस्सा शेअर केला आहे.
लोकसत्ताशी गप्पा मारताना विवेकने सांगितले की, मूळचा लालबागकार असल्याने गणपतीचा उत्साह आधीपासूनच असतो पण मी काही मोदकांचा विशेषतः उकडीच्या मोदकांचा फार मोठा फॅन नाही. मला माव्याचे, पेढयांचे मोदक आवडतात, ते मी कितीही खाऊ शकतो पण उकडीचे मोदक फार खायला जमत नाहीत. अलीकडेच मालिकेत जेव्हा गणपती विशेष भाग शूट केला गेला तेव्हा कावेरीने बनवलेले मोदक राजवर्धन स्वतःसाठी आहेत असे समजून खातो असा एक सीन होता. यावेळेस वेगवेगळ्या अँगलने शूट करताना विवेकला तब्बल आठ अक्खे मोदक खावे लागले. हे मोदक चविष्ट होते पण हाताएवढा मोदक आठ वेळा खाताना पुरेपूर दमछाक झाली होती असेही विवेक म्हणाला.
दरम्यान हे मोदक स्वतः निवेदिता सराफ यांनी सेटवर बनवले होते. विवेकने सांगितले की, निवेदिता सराफ या स्वतः तांदळाचे पीठ आणि इतर सामग्री घेऊन आल्या होत्या. सेटवरील बाप्पासाठी यावेळी सर्वांनी मिळून मोदक बनवले होते. हे मोदक अत्यंत चविष्ट होते. मालिकेत हे मोदक कावेरी म्हणजेच तन्वी मुंडले आणि सानिया यांनी एकतर मिळून बनवल्याचे दाखवण्यात आले होते.
निवेदिता सराफ या अस्सल सुगरण आहेत. सोशल मीडियावर त्या त्यांच्या खास रेसिपीज नेहमीच शेअर करत असतात. युट्युबवर सुद्धा त्यांचे रेसिपीचे चॅनेल आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाग्य दिले तू मला मालिकेत जेव्हा गणेश चतुर्थीचे सीन शूट झाले तेव्हा सुद्धा हौशीने त्यांनी स्वतः उकडीचे मोदक बनवले होते.