गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ ओळखल्या जातात. चित्रपट तसेच टेलिव्हिजन क्षेत्रातही त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून पुन्हा टेलिव्हिजनवर झळकल्या आहेत अन् यातील त्यांचं कामही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. त्याबरोबरच त्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातही काम करत आहेत.
नुकतीच निवेदिता यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे याच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये आजवर कित्येक सेलिब्रिटीजनी हजेरी लावून मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. आता निविदीता सराफ यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून मुलाखतीदरम्यान त्यांचे मनोरंजन क्षेत्रातील काम करण्याचे अनुभव, रंगभूमी व नाटकाविषयी एकूणच निर्माण झालेली अनास्था यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : पाच महीने उलटून गेले तरी ‘द केरला स्टोरी’ अद्याप OTT वर प्रदर्शित का झालेला नाही? जाणून घ्या
याच मुलाखतीमध्ये निवेदिता यांनी ज्येष्ठ अभिनेत्रींना काम न मिळण्याबद्दलही भाष्य केलं आहे. नुकतंच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण देशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. यावरच निवेदिता सराफ यांनी वक्तव्य केलं आहे. केवळ पुरस्कार देऊन चालणार नाही त्यांना कामही मिळायला हवं असं मत त्यांनी या पॉडकास्टमध्ये मांडलं.
याविषयी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुम्ही वहिदा रेहमान यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं, पण एवढ्यावरच ते थांबायला नको. त्यांना चित्रपटात भूमिका मिळायला हव्या. त्यांना केवळ एक पुरस्कार देऊन कोपऱ्यात बसवून ठेवणं योग्य नाही.” याबरोबरच निवेदिता यांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. नाटक आणि रंगभूमीसाठी नेमके कोणते बदल घडणं अपेक्षित आहे यावरही त्यांनी भाष्य केलं.