रवींद्र पाथरे

एखाद्या व्यक्तीबद्दलचं आपलं आकलन हे त्या व्यक्तीकडे आपण कसे बघतो, तिच्याबद्दल काय विचार करतो यावरून ठरत असतं. त्यात पूर्वानुभव, परिस्थिती आणि योगायोग यांचीही भर पडत असते. तशात नवरा- बायको हे नातं तसं कृत्रिमच! ते ठरवून किंवा प्रेमात पडून निर्माण झालेलं असतं. दोन संपूर्ण वेगळय़ा पार्श्वभूमीत, वातावरणात, परिस्थितीत आणि भिन्न तऱ्हेच्या माणसांत वाढलेल्या दोन व्यक्ती या नात्याने एकत्र येत असतात. साहजिकच त्यांना एकमेकांशी जुळवून घेताना संघर्ष करावा लागणंही स्वाभाविकच. तशात या नात्यात गृहीत धरणं आलं की कधीतरी त्याचा कडेलोट होऊन विस्फोटही आलाच. म्हणूनच नाटक, सिनेमा यांसारख्या कलाकृतीतून नवरा – बायको संबंधांवर बऱ्याच वेळा भाष्य केलेलं आढळतं. कारण हा विषय चिरंतन आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मित, संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ हे नाटकही याच विषयावर हास्यस्फोटक मल्लिनाथी करतं.

article about painting and sculpture by artist kishore thakur zws
कलाकारण : दिसण्यावरची दहशत 
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mpsc preparation strategy
MPSC ची तयारी : पर्यावरण भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन    
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
Vijay Tapas Drama Ruiya College Marathi Poetry
व्यक्तिवेध: विजय तापस
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…

अमृता आणि अनिकेत यांच्या नात्यातही अशीच दरी निर्माण झालीय. अनिकेत एका बडय़ा सॉफ्टवेअर कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर आहे. साहजिकच त्याला जास्तीत जास्त वेळ कंपनीच्या कामाला द्यावा लागतो. तर अमृता गर्भपातानंतर घरीच असते. नोकरीचा व्याप नसल्यानं तिचं आयुष्य अनिकेतभोवतीच केंद्रित झालंय. पण अनिकेत आपल्याला पुरेसा वेळ देत नाही, आपल्याकडे त्याचं दुर्लक्ष होतंय अशी अमृताची सततची तक्रार असते. त्यावरून त्यांच्यात कुरबुरीही सुरू झालेल्या असतात.

आणि एक दिवस या सगळय़ाचा स्फोट होतो. अनिकेतचं म्हणणं, ‘हेच माझे करिअर घडण्याचे दिवस आहेत. त्याला मी पूर्ण वेळ प्राधान्य दिलं तर काय चुकलं?’ अमृतानं हे समजून घ्यायला हवं. तर अमृताचं म्हणणं, ‘तू निदान घरी आल्यावर तरी माझी विचारपूस करतोस का? मला वेळ देतोस का?’ या भांडणाचं पर्यवसान ‘आपण वेगळं होऊ या’ या अनिकेतच्या त्राग्यापर्यंत जातं. पण अमृताला त्याचं हे वागणं, म्हणणं टोकाला गेल्यासारखं वाटतं. तिची बहीण त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला सांगते.. समुपदेशनाकरिता! त्याप्रमाणे ती दोघं अतिरेककर या मानसोपचारतज्ज्ञाकडे जातात. पण हा विचित्र पेहराव करणारा मानसोपचारतज्ज्ञ त्यांना चित्रविचित्र अटी घालतो. पण नाइलाजानं त्यांना त्या मान्य कराव्या लागतात. म्हणजे एकाच घरात राहून परस्परांशी बोलायचं नाही, शक्यतो बाहेरच जास्त वेळ काढायचा, स्वतंत्रपणे स्वैंपाक करायचा, नवरा – बायको म्हणून संबंध ठेवायचे नाहीत.. वगैरे वगैरे.

त्याप्रमाणे अमृता आणि अनिकेत वागायचं ठरवतात. परंतु एकाच घरात राहत असल्याने या गोष्टी टाळणं त्यांना शक्य होत नाही. तरीही ते खूप प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्यातली भांडणं, कुरबुरी कमी होत नाहीत.

मानसोपचारतज्ज्ञाच्या दुसऱ्या मीटिंगमध्ये अतिरेककर आधीच्या सूचनांच्या अगदी उलट सूचना करतो. म्हणजे एकमेकांशी संवाद साधा.. वगैरे. पण तोवर बिनसंवादाची त्यांना एवढी सवय झालेली असते की हेही त्यांना जड जातं.

अधूनमधून अतिरेककर त्यांच्या घरात घुसून त्यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्नही करत असतो. पण त्यालाही म्हणावं तसं यश येत नाही. अशात अमृताच्या वडलांना नागपूरला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. अमृता लगोलग नागपूरला जाते. पण कंपनीच्या महत्त्वाच्या मीटिंगमुळे अनिकेत मात्र तिच्यासोबत जाऊ शकत नाही. यामुळे अमृता भयंकर बिथरते. कायमचं घर सोडून जाते..

पुढे काय घडतं, हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच योग्य. लेखक संकर्षण कऱ्हाडे यांनी नवरा-बायकोच्या नात्यात परस्पर समज- गैरसमजांमुळे काय विस्कोट होऊ शकतो हे अत्यंत हास्यस्फोटक पद्धतीनं ‘नियम व अटी लागू’ या नाटकात मांडलं आहे. एकाच गोष्टीकडे परस्पर भिन्न दृष्टिकोनांतून पाहिलं की काय होतं हे त्यांनी हसत- खेळत, पण अत्यंत टोकदारपणे वेगवेगळय़ा प्रसंगांतून अधोरेखित केलंय. त्याला ‘अतिरेककर’ या विक्षिप्त मानसोपचारतज्ज्ञाची जोड दिल्याने यातला विनोद एका वेगळय़ाच पातळीवर जातो. त्याला फॅण्टसीचा स्पर्श होतो. वरकरणी हसतखेळत या विषयाची मांडणी लेखकानं केली असली तरी यातली समस्या गंभीर आहे.. तरुण मंडळींनी गंभीरपणे मनावर घेण्यायोग्य आहे. संकर्षण कऱ्हाडे हे लेखक म्हणून परिपक्व झाल्याचा दाखला या नाटकाच्या लेखनातून मिळतो. यातला अनिकेत अतिशयोक्त वागण्या-बोलण्याचा टोकाचा  नमुना सादर करतो. तर अमृता ही सहज, वास्तवदर्शी व्यक्ती आहे. त्यांच्यातील समस्या सोडवू पाहणारा मानसोपचारतज्ज्ञ अतिरेककर त्यांच्यात समतोल घडवण्यासाठी नाना क्लृप्तय़ा लढवतो. तो यात ‘कॉन्शस माइंड’ची भूमिका प्रतीकात्मकरीत्या निभावताना दिसतो. हे सगळं रसायन लेखकानं छान जमवलं आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपली नेहमीची गांभीर्यपूर्वक मांडणीची, सादरीकरणाची प्रक्रिया बाजूला ठेवत ‘नियम व अटी लागू’तल्या विनोदाला ते सहजगत्या सामोरे गेले आहेत. गंभीर विषय, पण मांडणी हास्यस्फोटक हा फॉम्र्युला त्यांनी लीलया हाताळला आहे. प्रत्येक पात्राची त्याची त्याची वागण्या-बोलण्याची पद्धत, व्यक्त होण्याची पद्धत कायम ठेवत त्यांच्यातील विसंगतीतून, विरोधाभासातून त्यांनी यातलं नाटय़ उभं केलं आहे. त्यांच्या चतुरस्र दिग्दर्शकीय प्रतिभेचा त्यातून प्रत्यय येतो. असंही नाटक आपण दिग्दर्शित करू शकतो याचा वानवळा त्यातून त्यांनी दिला आहे. पात्रांच्या क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रिया यांचा जो मेळ त्यांनी घातला आहे, त्याने एक उच्च दर्जाचं विनोदी नाटक आकारात जातं. अनिकेतचं मोकळंढाकळं व्यक्तिमत्त्व, तर अमृताचं संयमित वावरणं यांतून एक वेगळंच ‘रसायन’ प्रेक्षकांसमोर येतं. त्यात भरीत भर अतिरेककरांची!

प्रदीप मुळय़े यांनी अनिकेत- अमृताचं घर, अतिरेककरांचं ऑफिस आणि अमृताचं नागपूरचं माहेरघर त्यातल्या भिन्नत्वासह मूर्त केलं आहे. किशोर इंगळे यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातले मूड्स ठळक, गहिरे केले आहेत. अशोक पत्की यांनी संगीतातून नाटकाचा ऱ्हिदम अचूक पकडला आहे. श्वेता बापट यांनी अतिरेककरांना चित्रविचित्र वेशभूषा देऊन नाटकाला फँटसीचा रंग दिला आहे. भरत वर्दम यांची रंगभूषाही चोख. संकर्षण कऱ्हाडे यांच्या गीताला मयूर वैद्य यांच्या नृत्यआरेखनाने न्याय दिला आहे.

संकर्षण कऱ्हाडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे हे आजवर सिद्ध झालेलंच आहे. आपणच लिहिलेल्या नाटकातील अनिकेत ही प्रमुख भूमिका त्यांनी त्यातल्या सगळय़ा बारकाव्यांनिशी साकारली आहे. विनोदाचं अंग आणि समज तर त्यांना आहेच. त्याचा वापर कुठं आणि कसा करायचा याचं प्रात्यक्षिकच त्यांनी या नाटकात दाखवलं आहे. अनिकेतचं वर्कहोलिक व्यक्तिमत्त्व, त्यातून त्याचा घडलेला इतरांना गृहीत धरण्याचा स्वभाव आणि कुठल्याही टोकाला जाऊन त्याचं समर्थन करण्याची अनिकेतची खासियत नाटकाच्या विनोदी घडणीत महत्त्वाची भूमिका निभावते. अचूक टायिमगने संवादफेक हे त्यांचं वैशिष्टय़ इथं कामी आलंय. भावनात्मक प्रसंगही ते तितक्याच ताकदीनं खुलवतात.

अमृता झालेल्या अमृता देशमुख आपल्या संयत, तरीही ठामपणानं या भूमिकेचे निरनिराळे कंगोरे व्यक्त करतात. नवऱ्याकडून आपल्याला ‘क्वालिटी टाइम’ मिळावा ही साधी अपेक्षाही पुरी न झाल्याने कातावलेली, तो मिळावा यासाठी झगडणारी एक साधीसुधी गृहिणी त्यांनी वास्तवदर्शीपणे उभी केली आहे. त्यांच्या भूमिकेचा आलेख सरळ रेषेत जाणारा आहे. तरीही त्या त्यात लोभसवाणे रंग भरतात.

मानसोपचारतज्ज्ञ अतिरेककर नावाप्रमाणेच अतिरेकी आहेत. त्यांचे नियम व अटी जगावेगळय़ा आहेत. त्यांचं अवघं व्यक्तिमत्त्वच अर्कचित्रात्मक आहे. प्रसाद बर्वे यांनी त्यांचं अतरंगी रूप फर्मास उभं केलं आहे. फँटसीचा एलिमेंट त्यांनी अचूक पकडला आहे. त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वानेही त्यांना या भूमिकेत साथ दिली आहे. एकुणात, एक प्रसन्न, हास्यस्फोटक, पण अंतर्यामी गंभीर विचार मांडणारं हे नाटक आहे. नवरा- बायकोतील समस्यांवरच्या नाटकांत ते वेगळं उठून दिसतं, हे  खरं.