चार दशकांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी असे ही दिवस पाहिले आहेत की जेव्हा चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि प्रचार जवळजवळ अस्तित्वात नव्हता. त्याचप्रमाणे, चित्रपटांच्या भाऊगर्दीत प्रसिद्धीविना चित्रपट हरवून जाण्याची शक्यता असल्याचा आत्ताचा काळदेखील ते अनुभवत आहेत. असे असले तरी, चित्रपटाचे भवितव्य हे त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्याचे त्यांचे ठाम मत आहे. सध्या अमिताभ बच्चन शुजित सिरकार दिग्दर्शित ‘पिकू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, सोशल नेटवर्किंगवरील त्यांच्या ‘एक्सटेंण्डेड फॅमिली’साठी ‘पिकू’ चित्रपटाच्या कोलकात्यामधील चित्रीकरणस्थळावरची छायाचित्रे शेअर करीत आहेत. चित्रपटकर्त्यांना त्यांची ही कृती आवडो अथवा न आवडो त्यांनी हे करणे सुरुच ठेवले आहे. याविषयी ते आपल्या ब्लॉगवर लिहितात, चित्रपटकर्त्यांना आश्चर्य वाटत असून, पिकू चित्रपटाच्या चित्रीकरणस्थळावरची छायाचित्रे प्रसिद्ध न करण्याविषयी ते मला सांगत आहेत. चित्रपटकर्त्यांना चित्रपटाच्या प्रसिद्धीची चिंता लागून राहिली आहे. परंतु… माझ म्हणण आहे की… तुम्ही कोणतीही योजना राबवा, जर चित्रपटाची गुणवत्ता चांगली नसेल, तर कोणताही प्रसिद्धी कार्यक्रम वाईट चित्रपटाचे भाग्य बदलू शकत नाही. त्यांचा ‘शमिताभ’ चित्रपट पुढच्या वर्षी ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. याविषयी आपल्या ब्लॉगमध्ये ते लिहितात, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या जोरदार प्रसिद्धीस सुरुवात होईल. त्यानंतर, या महान अभिनेत्याचा ‘वझिर’ हा चित्रपट २०१५ च्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होत असून, त्याच्या प्रसिद्धीची घाई नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या ब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, हल्ली काहीही लपवून ठेवणे कठीण आहे. आजच्या युगात तुम्ही जिथे जाल तिथे लाखोनी मोबाईल कॅमेरे तुमचा पाठलाग करत असताना, जनतेपासून काही लपवून ठेवणे अशक्य झाले आहे. त्यापेक्षा जनतेला परिस्थितीचा भाग बनवून, पुढे येणारा अतिप्रसंग टाळता येऊ शकत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी ‘पिकू’ चित्रपटाच्या शुटिंगस्थळावरून सोशल नेटवर्किंगवर शेअर केलेले अनुभव आणि छायाचित्रांचा चाहते आनंद घेत आहेत. ‘पिकू’ चित्रपटात ते इरफान खान आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसतील.

Story img Loader