नाव प्रेम असले म्हणून काय झाले हो.. खऱ्या आयुष्यात नाही ते नाहीच पण, पडद्यावरही प्रेमासाठी जोडीदार मिळणे सलमान खानला दुरापास्त झाले आहे. त्यामुळे, ज्या सूरज बडजात्यांचे चित्रपट त्याने मेरा ‘प्रेम’ अमर है करत गाजवले, त्यांच्याच नव्या चित्रपटात इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा प्रेमची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सलमानला पडद्यावर कोणी जोडीदारच मिळेनासा झाला आहे. आता बॉलिवूडची नवी ‘ड्रीमगर्ल’ दीपिका पडुकोणच ही भूमिका मिळवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा असून तिला यश आल्यास सलमान-दीपिका प्रथमच पडद्यावर एकत्र दिसतील.
‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’ या तीन चित्रपटांमध्ये सलमान खानने बडजात्यांसाठी ‘प्रेम’ रंगवला. त्यानंतर, मात्र बडजात्यांनी नवे चेहरे घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहिल्यांदा ‘विवाह’मध्ये शाहीद कपूर आणि ‘एक विवाह ऐसा भी’साठी सोनू सूद असे दोन नवीन ‘प्रेम’ आजमावले गेले. पण, सलमानने रंगवलेल्या प्रेमाची सर त्या चित्रपटांतील प्रणयाला लाभली नाही आणि ते चित्रपट आले तसेच निघूनही गेले. इतक्या वर्षांनंतर बडजात्यांचा ट्रेडमार्क असलेला ‘प्रेम’पट पुन्हा काढायचा विचार त्यांच्या मनात डोकावला तेव्हा सलमानशिवाय त्यांना पर्याय सापडेना. सलमाननेही बडजात्यांवरच्या प्रेमाखातर लगोलग होकार दिला. मात्र, तेव्हापासून हा चित्रपट केवळ नायिका बदलांमुळे चर्चेत आहे.
पहिल्यांदा ‘प्रेम’ची नायिका म्हणून अनुष्का शर्माची निवड झाली होती. पण, काही कारणांमुळे ती बाहेर पडली. मग एलिना डिक्रूझ, करीना कपूर आणि अगदीच कोणी नाही तर नर्गिस फाकरीचाही विचार करण्यात आला होता. पण, काही ना काही कारणांमुळे यांच्यापैकी कोणाचेही जमेना. अखेर, सलमानबरोबर चित्रपट करायची इच्छा असल्याचे दीपिकाने जाहीर करताच बडजात्यांनी तिच्याशी संपर्क साधला. दीपिकालाही ‘प्रेम’ बरोबर प्रेम रंगवायची संधी सोडायची नाही. त्यामुळे तिची तारखांची जुळवाजुळव सुरू असल्याचे समजते. पण, अजून तरी तिच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. नव्या चित्रपटाचे शेडय़ूलही लांबलचक असल्याने नायिकेच्या त्यापद्धतीने तारखा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, असे बडजात्यांचे म्हणणे आहे. दीपिकाच्या तारखा जुळाव्यात म्हणून त्यांनीही देव पाण्यात घातले आहेत. नव्या वर्षांत सलमानला खऱ्या आयुष्यात जोडीदार मिळो ना मिळो निदान पडद्यावर तरी मिळू दे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा