अभिनेते राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राची प्रत त्यांची निकटवर्तिय अनिता अडवानी यांना देण्याबाबतच्या आदेशाविरूध्द राजेश खन्ना यांची कन्या टि्ंवकलने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दाखल करून घेतली. अनिता अडवानी यांना राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राची प्रत देण्याच्या न्यायाधीश आर. डी. धनुक यांनी ३० जुलै रोजी दिलेल्या आदेशाविरुद्धची सुनावणी मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्यायाधीश एम. एस. सोनक यांच्या पीठापुढे पार पडली. आपण राजेश खन्ना यांच्याबरोबर आशीर्वाद या त्यांच्या बंगल्यात राहात होतो, असा दावा अनिता अडवाणी यांनी केला होता. त्याचप्रमाणे राजेश खन्ना यांच्या प्रकृती अस्वास्थांमुळे ते सही करण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांच्या मृत्यूपत्राच्या खरेपणालाही त्यांनी आव्हान दिले. राजेश खन्ना यांची मुलगी टि्ंवकल खन्नाने याप्रकरणाबाबत न्यायाधीश धनुक यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. टि्ंवकलने दाखल केलेल्या याचिकेवर जोपर्यंत सुनावणी होत नाही, तोपर्यंत न्यायाधीश धनुक यांनी दिलेल्या आदेशांवर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याआधी, धनुक यांच्या आदेशाला खंडपीठाने सोमवारपर्यंत अंतरिम स्थगिती दिली होती.
अनिता अडवानी या खन्ना कुटुंबाच्या सदस्य नसून, त्या वारसदारदेखील नसल्याने त्यांना मृत्यूपत्राची प्रत मिळण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत वकील जनक द्वारकादास आणि बिरेन्द्र सराफ यांनी ट्विंकलची बाजू मांडली. त्याचप्रमाणे अडवानी यांचा दावा हा घरगुती हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत असल्याने त्यांना राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राची प्रत मिळण्याचा अधिकार पोहचत नसल्याचेदेखील त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

Story img Loader