दिल्ली बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर सातत्याने देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होत असलेले अत्याचार या पाश्र्वभूमीवर रूपेरी पडद्यावरील ‘आयटम साँग’मधून केल्या जाणाऱ्या स्त्रीच्या अंगप्रदर्शनाची सेन्सॉर बोर्डाने गंभीर दखल घेतली असून याबाबत काही मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्याची जोरदार चर्चा सुरू होती. परिणामी सरसकट सर्वच चित्रपटांत ‘आयटम साँग’ असेल तर ‘ए’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला जातोय की काय अशी भीती व्यक्त होत होती. ‘आयटम साँग’ असेल तर त्या चित्रपटांना सरसकट ‘ए’ प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे रविवारी सेन्सॉर बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आल्याने चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे.
हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास ‘आयटम साँग’ असते. या गाण्यांमध्ये अश्लीलता किती दाखविण्यात आली आहे याची नीट चाचपणी केली जाणार असल्यावरून वादविवाद निर्माण झाला होता. ‘आयटम साँग’ असलेल्या सरसकट सर्व चित्रपटांना ‘ए’ प्रमाणपत्र देण्याचा नियम केला जाणार होता. म्हणून चित्रपट निर्माते धास्तावले होते. अभिनेत्री करिना कपूरपासून ते प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, मलायका अरोरा खान, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नाडिस, सोनाक्षी सिन्हा आदी अभिनेत्रींनी विविध चित्रपटांतून सादर केलेली ‘आयटम साँग’ गाजली आहेत. ‘आयटम साँग’मध्ये कशा प्रकारे स्त्री देहाचे प्रदर्शन केले आहे याचा नीट विचार करून नंतरच ‘ए’ प्रमाणपत्र द्यायचे किंवा नाही हे ठरविण्यात येणार असल्याचे सेन्सॉर बोर्डाने आता स्पष्ट केले आहे.

Story img Loader