मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांकडून मराठी सिनेमाची गळचेपी होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या ‘तानी’ सिनेमाला मुंबईत मल्टिप्लेक्सवाल्यांनी एकही स्क्रीन उपलब्ध करून दिलेला नाही. फक्त मोजक्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये केवळ एक खेळ मिळाल्याने निर्मात्यांपुढे मोठाच पेच पडला आहे. ‘यशराज फिल्म्स’चा ‘औरंगजेब’ हा बडा सिनेमाही शुक्रवारी प्रदर्शित होत असून मुंबई-ठाण्यातील जवळपास सर्वच मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये या सिनेमाचे खेळ होणार आहेत.
यासंदर्भात ‘तानी’ सिनेमाचे दिग्दर्शक संजीव कोलते म्हणाले की, विदर्भातील सायकल रिक्षावाला आणि त्याचे कष्टमय जीवन यांसारख्या आतापर्यंत लोकांसमोर न आलेल्या विषयावर चांगला सिनेमा आम्ही तयार केला आहे. अरूण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांसारखे कलावंत यात काम करीत आहेत.
आमचे वितरक समीर दीक्षित महिन्याभरापासून मल्टिप्लेक्स बुकिंगसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, चित्रपट प्रदर्शनाच्या तोंडावर असताना मल्टिप्लेक्सवाल्यांनी एकही चित्रपटगृह आमच्या सिनेमाला मुंबईत उपलब्ध करून दिले नाही. आता आम्ही शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडे धाव घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यासंदर्भात अभिनेते आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे म्हणाले की, शिवसेना चित्रपट सेनेतर्फे संबंधित सर्व मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांना ‘तानी’ सिनेमासाठी शोज् द्यावेत असे विनंतीवजा निवेदन उद्या, म्हणजे शुक्रवारीच दिले जाणार आहे. त्याउपरही त्यांनी खेळ ठेवले नाहीत तर कोणती पावले उचलायची याबाबत निर्णय घेण्यात येईल.