ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून बॉक्स ऑफिसवर आघाडी घेणे आणि प्रचंड लोकप्रियता मिळविण्यात सलमान खानचा हात कुणीच धरू शकणार नाही. ईद आणि सलमानचे चित्रपट हे जणू समीकरणच बनले असून आपणच काय अन्य कुणाही कलावंताला याबाबतीत सलमान खानवर कुरघोडी करणे जमणार नाही, अशी स्पष्ट कबुलीच अभिनेता इम्रान खानने दिलीय.
सलमान खानचा ‘वॉन्टेड’ हा चित्रपट २००८ साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून त्याचा प्रत्येक चित्रपट ईदलाच प्रदर्शित केला जात असून त्याचे चित्रपट सुपरहिटही झाले होते.
मात्र यंदा ईदला म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्याच आठवडय़ात ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई २’ प्रदर्शित होतोय. यात इम्रान खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच तुझा चित्रपट सलमान खानच्या लोकप्रियतेला मात देणार का असे विचारले असता स्पष्ट शब्दांत इम्रान खानने ‘ईद आणि सलमान व त्याचे चित्रपट’ हे समीकरण बनले असून सलमान खानवर मात करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असे मोकळेपणी सांगितले. ऑगस्ट महिन्यात येत असलेल्या ईदच्या दिवशी सलमान खानचा एकही चित्रपट झळकणार नाही. म्हणूनच की काय ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई २’ हा इम्रान, अक्षयकुमारचा चित्रपट आणि सुपरस्टार शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असे दोन चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत.
सलमान खानचे ‘किक’ आणि ‘मेंटल’ या दोन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असून पुढील वर्षी हे चित्रपट प्रदर्शित होतील. त्यामुळेच यावर्षी ईदच्या दिवशी इम्रान खान आणि शाहरूख खान यांच्या चित्रपटांमध्ये बॉक्सऑफिसवर सर्वाधिक गल्ला गोळा करण्याची चुरस निर्माण होणार आहे.

Story img Loader