हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे पती-पत्नीच्या नातेसंबंधात मोठ्याप्रमाणावर तणाव निर्माण होताना आढळून येत आहे. परिणामी समाजात घटस्फोटांची संख्या वाढते आहे. बॉलिवूडसारख्या क्षेत्रात तर याचे प्रमाण अधिकच आहे. असे असले तरी बॉलिवूडमधील गौरी आणि शाहरूख खान, काजोल आणि अजय देवगणसारख्या जोड्या गेली अनेक वर्षे सुखा-समाधानानी संसार करताना पाहायला मिळतात. यशस्वी लग्नामागे कोणताही गुरू-मंत्र नसल्याचे, गेली पंधरा वर्षे कजोलसोबत सुखासमाधानाने संसार करणारा अभिनेता अजय देवगणचे म्हणणे आहे. न्यासा आणि युग ही दोन मुले असलेल्या या दोघांचे १९९९ मध्ये लग्न झाले. यशस्वी लग्नाविषयी बोलताना अजय म्हणतो, स्वत: आनंदी राहण्याबरोबर दुसऱ्यालाही आनंदी ठेवणे गरजेचे आहे. यशस्वी लग्नासाठीचा कोणताही गुरू-मंत्र नाही. तुम्ही फक्त आयुष्यभर तुमच्या जीवनसाथीला महत्व आणि सन्मान द्यायला हवा. लग्नसंस्थेतील बांधिलकी जपल्यास सर्व काही योग्य होते. लग्न करण्यास बॉलिवूड हे योग्य क्षेत्र नाही यावर अजयचा विश्वास नाही. याविषयी बोलताना तो म्हणतो, लग्न मोडणे हे फक्त बॉलिवूडमध्येच होत नसून, सर्व ठिकाणी होते. हे व्यक्तीसापेक्ष असून, आपले वैवाहिक जीवन ते कशाप्रकारे जगतात, यावर ते अवलंबून असते.
प्रभू देवाचा ‘अॅक्शन जॅक्सन’ आणि रोहित शेट्टीचा ‘सिंघम-२’ या दोन मनोरंजनात्मक मसाला चित्रपटात अजय दिसणार आहे. ‘अॅक्शन जॅक्सन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, ‘सिंघम-२’चे शुटिंग अजून सुरू होणे बाकी आहे.

Story img Loader