मी आज तुमच्याशी माझ्या मनातल्या एका विषयावर बोलायचं ठरवलंय. म्हणजे मी प्रयत्न करणारेय.. तुमच्यापर्यंत किती पोहोचू शकेन माहीत नाही; पण ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या माझ्या चार लेखांना जसं सांभाळून घेतलंत तसंच याही वेळी सांभाळाल, अशी ग्वाही देतंय मला माझं मन.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते, म्हणजे आपल्या घरातल्या शो-पिसेसपासून, कपडय़ांपासून, किचनमधल्या सामानापासून आपण टापटीप ठेवलं, तर गरजेच्या वेळी या कप्प्यातली गोष्ट त्या कप्प्यात शोधावी लागत नाही. त्याप्रमाणेच आपल्या गरजेला आयुष्यातल्या कुठल्या माणसाशी संवाद साधावा याचा विचार करावा लागत नाही. कारण आपल्या मनातही आपण कोणाला किती महत्त्व देतो त्यानुसार त्या त्या माणसांसाठीचे कप्पे आपण ठरवलेले असतात. आपल्या डोळ्यांमध्येसुद्धा ना, सगळ्या गोष्टींच्या फ्रेम्स सेट असतात. म्हणजे बघा हा! आता हा अनुभव बहुतांश जणांनी घेतला असेल (अर्थात ज्यांना स्वच्छतेची आवड आहे अशांनी जास्त). आपण घराबाहेर असताना, घरातल्या एखाद्या गोष्टीची जागा विचारायला कुणी फोन केलाच, तर पटकन आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टीसंदर्भातली एक फ्रेम उभी राहते आणि मग आपण त्या गोष्टीची योग्य जागा सांगून मोकळे होतो. सांगायचा मुद्दा असा की, हे कप्पे, या फ्रेम्स आपल्याही नकळत आपलं आयुष्य सोपं करत असतात.
आम्हा कलाकारांच्या आयुष्यातही ‘फ्रेम’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता तो कसा? तर एखादा सीन करण्यासाठी जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक कलाकार एकत्र येतात तेव्हा सगळ्यात सुरुवातीला एक ‘लाँग शॉट’ लागतो; म्हणजेच एक अशी फ्रेम तुम्हाला दिसते ज्यात सगळ्या कलाकारांच्या उभ्या राहण्याच्या किंवा बसण्याच्या जागा, त्याच्या क्रिया आणि घटना घडणारी खोली असं सगळं तुम्हाला दिसतं. त्यानंतरच्या फ्रेममध्ये कधी कलाकारांचे चेहरे एकमेकांशी संवाद साधताना दिसतात ज्याला ‘टू शॉट’ म्हणतात, तर कधी एकमेकांच्या समोरासमोर बसून म्हणजेच एकाचा चेहरा आणि त्यासमोर कॅमेऱ्यात पाठ करून बसलेला दुसरा कलाकार असे आळीपाळीने चेहरे दिसतात, ज्याला ‘ओव्हर द शोल्डर’ शॉट म्हणतात आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आम्हा प्रत्येक कलाकाराचा आवडीचा शॉट, तो म्हणजे ‘क्लोज्’. एक अशी फ्रेम ज्यात कलाकार फक्त आणि फक्त एकटाच दिसतो आणि ज्या फ्रेमवर आम्ही सगळेच प्रेम करतो. त्यात आमचे हावभाव, संवेदना, शब्दफेक.. थोडक्यात आमची कला स्पष्ट दिसते, कारण आमच्या कामाबद्दल व्यक्त होण्याची सगळ्यात जास्त संधी मिळते आम्हाला. ही फ्रेम बरेचदा आम्हालाही आत्मपरीक्षण करायला लावणारी असते. मुळात स्वत:ला पाहण्याचं साधन आम्हा कलाकारांना नेहमीच हवंहवंसं वाटत असतं. म्हणूनच आरसा हाही आमच्या फार जवळचा असतो; पण हल्ली घाईगडबडीच्या वेळी आरशाचंही रूप थोडं बदललंय बरं का. मोबाइलमध्ये फ्रंट कॅमेरा ऑन करून मोबाइलच्या फ्रेममध्ये आम्ही स्वत:ला पाहायला लागलोय, ज्याला आपण ‘सेल्फी’ म्हणतो. तर हा सेल्फी म्हणजे मला स्वत:मध्ये डोकावून बघण्याचं माध्यम वाटतो. मी बरेचदा ‘मी टाइम’मध्ये माझेच सेल्फीज काढून बघत असते. कारणं खूप वेगवेगळी असतात. कधी तरी तयार होऊन निघाल्यावर मेकअप चेहऱ्यावर नीट टिकलाय ना, हे बघण्यासाठी. कधी एखादा विचार चालू असताना माझा चेहरा काय म्हणतोय हे समजून घेण्यासाठी. कधी तरी निष्क्रिय बसलेली असताना त्या क्षणाचा चेहरा टिपण्यासाठी, काहीच कारण नसताना काही वेळा छान, शांत वाटत असतं आपल्याला त्या वेळचं समाधान पाहण्यासाठी; नाहीच तर वाचन करताना त्या शब्दांमागची भावना योग्य टिपली आहे ना चेहऱ्याने हे पडताळून पाहण्यासाठी. सॉरी हा! तुम्हाला कदाचित वेगळं वाटलं असेल हे वाचताना, पण काय करू कलाकाराचा जन्म म्हटल्यावर एक्स्प्रेशनचे भुकेले.. असो. तर दिवसभरातला हा असा ‘माझा’ वेळ घालवताना ‘सेल्फी’ फार जवळचा वाटतो मला; पण तुम्हाला कळतंय का, माझी ही सगळी धडपड खूप शांतपणे टीव्हीवरच्या क्लोज् फ्रेमसारखीच मोबाइलच्या फ्रेममधून स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची आहे. त्यामुळे माझ्यासाठी ‘सेल्फी’ हा सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ कॉन्शस, सेल्फ इम्प्रुव्हमेंटचं माध्यम आहे. त्यामुळे कुणी तरी त्यामध्ये डोकावू लागलं की, मला व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला आल्यासारखं वाटतं.
हा सेल्फी कधी तरी त्रासदायकही होऊन जातो. म्हणजे बघा ना, नाटक संपल्यावर आम्हाला भेटायला येणारे लोक पटकन हात उंचावून सेल्फी घेऊन निघूनही जातात, जे बहुतांश वेळा आम्हाला माहीतच नसतात. आमचं सोडा हो, नेतेमंडळींच्या आजूबाजूच्या गर्दीतला एखादा शत्रुपक्षातला माणूस सहज म्हणून त्यांच्याशी हात मिळवताना सेल्फी घेतो आणि आपल्याकडे पुढचा अख्खा दिवस चर्चासत्राला पुरतो. मुळातच सेल्फीमधल्या छोटय़ाशा फ्रेममधला फोटो हा दिसताना आपले जणू घनिष्ठ जिव्हाळ्याचे संबंध आहेत एखाद्याशी, हे भासवतो, जेव्हा बरेचदा साधी तोंडओळखही नसते. आता नैसर्गिक सुखांनाही मुकू लागलोय हो आपण! खरंच, बघा ना! पूर्वीपर्यंत उघडय़ा डोळ्यांना निसर्गाचं सौंदर्य टिपणारे आपण आज मोबाइलच्या फ्रेममधून दिसेल तितकाच निसर्ग पाहतोय आणि सेल्फी कॅमेऱ्याने तर याही वरताण परिस्थिती निर्माण केलीय. कारण याच्या नादात आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे चक्क पाठ फिरवून उभे राहू लागलोय आपण आणि हा फोटो कॅप्चर करताना आपली आवडीची गोष्ट ही ‘बॅकग्राऊंड’ बनून राहिली आहे, याचंही भान उरलं नाहीए आपल्याला.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कधीही वाईटच. सेल्फ ऑपसेसड् जनता या सेल्फीजच्या नादात स्वत:च्या बेसिक कॉमनसेन्सही गमावून बसू लागलीय, ज्याचे तोटे फार मोठे होऊन बसलेत, म्हणूनच तर एका नावेमधली मित्रमंडळींची टोळी नावेच्या एका बाजूला उभं राहून फोटो काढताना होत्याची नव्हती होऊन गेली. गेट वे ऑफ इंडियावर कोणी तरी पाय घसरून, तोल जाऊन जीव गमावलाय, तर कोणी बॅण्डस्टॅण्डच्या पाण्यात वाहून गेलंय. शाळेतल्या ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयाचं गांभीर्य आज मोठेपणी पावलोपावली उलगडायला लागलंय. भीतीही वाटू लागलीय.
आम्हा कलाकारांना सेल्फी या माध्यमामुळे आजकाल विशेष सतर्क राहावं लागतंय. तसं नाही केलं तर मनातले कप्पे आणि समाजातले कप्पे यात सोशल साइट्सवर गल्लत होऊ लागते. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही त्या त्या कप्प्यातच असावी आयुष्य सोपं राहण्यासाठी. त्याचं काय आहे ना, आजच्या गर्दीच्या या जगात आमच्यासाठी कुठला लक्ष्मण येऊ शकणार आहे ‘लक्ष्मणरेषा’ आखायला. म्हणूनच आम्हालाच आमच्यातल्या सीतेचं रक्षण करणं भाग झालंय आणि त्यामुळेच तर फॅन्सना फोटो देताना एखाद्याने एक पाऊल जवळ सरकून फ्रन्ट कॅमेरा ऑन केलाच, तर मीही माझ्या मर्यादांच्या आवारातून गोड हसून म्हणते, नो सेल्फी प्लीज!
तेजश्री प्रधान –