– वेदवती चिपळूणकर

सगळीकडे केवळ एकच चर्चा आहे. मग ते फेसबुक असो, भाडिपाचा व्हिडीओ असो, व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा इन्स्टाग्राम स्टोऱ्या किंवा ट्विटर ट्रेण्ड… सगळं एकदम ‘गेम ऑफ थ्रोन्स’मय झालयं. सामन्यपणे सोमावारी सकाळी झोपेतून उठण्यासाठी कंटाळा करणारी तरुणाई आज चक्क साडे-सहाचा गजर लावून ‘हॉट स्टार’वर लॉगइन दिसली. मागील आठवड्या भरापासूनचे काऊण्ड डाऊनचे स्टेटस, कालपासूनच अलार्मचे स्टेटस असं सगळं काही आज अखेर संपलं आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या शेवटच्या पर्वातील पहिला भाग आज प्रदर्शित झाला.

बरं हे ज्यांना आवडत नाही किंवा ज्यांना यात रस नाही त्यांना ही फॅन मंडळी ‘श्या, काय तुम्ही’ असंही वर ऐकवून दाखवत आहेत. हे त्यांचं ‘फॅनत्व’ अतिरंजितपणाच्या कक्षेत येत नाही, मात्र फॅन्स नसलेले लोक त्यांच्यासाठी ‘डाउनमार्केट असतात किंवा ‘सिक्रेड गेम्स’ सारख्या देशी वेब सिरीज पाहणारे त्यांच्या मते, ‘जरा अतिच’ आणि ‘शो ऑफ’ करत असतात. असंच काहीसं फ्रेण्ड्स, मारव्हर्स, डीसी यांच्याबद्दलही दिसून येतं. याच प्रकारचा अतिउत्साह कॉमिक बुक्समधल्या पात्रांवर आलेल्या चित्रपटांच्या वेळीही दिसून आला. काहीकाहींना असतं एखाद्या गोष्टीचं प्रचंड वेड आणि काहीवेळा अनेकांना एकाच वेळी असतं असं एखादं वेड. वेड असण्यात त्यांचा दोष नाही कारण तो मानवी स्वभाव आहे, पण ते वेड समोरच्याला आहे की नाही यावरूनसमोरच्याची परीक्षा करणं किंवा त्याच्याबद्दल मतं बनवणं यात मात्र संपूर्णपणे त्यांचाच दोष आहे.

परवाच भेटलेल्या एका दादाने ‘फ्रेण्ड्स’चा टीशर्ट घातला होता. त्यावरून बोलताबोलता सहजच तो म्हणून गेला ‘कोण नसतं फ्रेण्ड्सचं फॅन’! जगाबद्दल इतकं सहजपणे मत बनवून मोकळं होणाऱ्या या अशा ‘फॅन्स’ना त्यांच्या आवडत्या गोष्टींपलीकडे काही दिसत नसतं. त्यांना एखादा शो आवडतो म्हणजे तो साऱ्या जगाला आवडतो असं ते मानतात किंवा साऱ्या जगाला ते आवडलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ‘फ्रेण्ड्स’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अशा प्रकारच्या काही इंग्रजी मालिका तर जगभरात एकमेवाद्वितीय असल्यासारखं त्यांच्या फॅन्सचं मत असतं. आयुष्यात त्या मालिका पाहिल्या नाहीत तर ‘काय पाहिले, डोंबल?’ अशा अर्थाची त्यांची भूमिका असते. एखाद्याला त्या आवडत नाहीत म्हटल्यावर त्यांना इंग्रजीच कळत नसावं किंवा त्यांची अभिरुचि चांगली नसावी असा निष्कर्ष काढून हे लोक मोकळे होतात. पाश्चात्त्य संस्कृतीत आणि त्यांच्या नातेसंबंधांच्या व्याख्येत बुडालेल्या या फॅन्सना कदाचित ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यात दडलेला मनाचा ओलावा, तरल भाव, घट्ट नातेसंबंध, नाती टिकवण्यासाठी केली जाणारी धडपड अशातली कोणतीच गोष्ट कळण्याची, समजण्याची आणि जाणवण्याची अपेक्षा आम्ही भाबड्या लोकांनी तरी कशी करावी? ज्यांना हॉलिवूडमधला रोमान्स म्हणजेच केवळ रोमान्स वाटतो त्यांना ‘जुळून येती रेशीमगाठी’मधलं मेघना-आदित्यचं नजरेतून व्यक्त झालेलं प्रेम कसं कळावं? त्यांच्या संवेदना सक्षम नाहीत आणि जे सरळ आणि उघड दाखवलं जातं तेवढंच कळण्याची त्यांची प्रतिभा आहे असं आम्ही का म्हणू नये?

फॅंटसी आणि फिक्शन म्हणून हे कॉमिक बुकातले हिरो, सॉरी सुपरहिरो, आवडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आपल्याकडे तयार होणारे चित्रपट म्हणजे त्यांना टाकाऊ वाटतात आणि आम्ही ते बघतो म्हणजे आमचाही ‘दर्जा’ त्यावरून ठरतो. एखादी गोष्ट जर कल्पनात्मक आहे तर कल्पना कोणाच्याही कशाही असू शकतात. कल्पनांना तर्कशास्त्र आणि विज्ञान जोडायला सुरुवात केली तर त्या कल्पना राहणारच नाहीत. सुपरपॉवर्स असणारा सुपरहिरो म्हणजे उच्च कल्पना आणि स्वतःचं वेगळं झालेलं डोकं परत जोडणारा ‘काशमोरा’मधला ‘राज नायक’ म्हणजे काहीतरी थुकरट कल्पना असा निष्कर्ष कोणी काढला? किळसवाणी जाळी टाकणारा स्पायडरमॅन म्हणजे ग्रेट आणि लाल कपडे घालणारा शक्तिमान गावठी हे कोणी ठरवलं? जिथे प्रश्न फॅंटसीचा येतो तिथे फॅंटसीसुद्धा लॉजिकल असावी आणि त्यातही विज्ञान घुसडावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे तद्दन मूर्खपणाचं लक्षण आहे. फॅंटसी ही कल्पना असते आणि कल्पनेला कोणत्याच भिंती घालता येत नाहीत, कल्पनेला कोणत्याच मर्यादा नसतात आणि कल्पना चूक किंवा बरोबर ठरवता येत नाही, किंबहुना ठरवायची नसते. कल्पनांना ‘दर्जा’ किंवा ‘लायकी’ नसते, तर कल्पना ही कल्पना असते. भारतीय काय आणि पाश्चात्त्य काय, कल्पनेची किंमत किंवा मूल्य ठरवता येत नाही. कॉमिक बुकातल्या कल्पना बघणाऱ्यांना आपल्याकडच्या कल्पना बघायचं सुचवलं की त्यांना वाटतं आम्ही ‘देशप्रेमा’पोटी हे सुचवतो. कोणी कोणत्या कल्पना उचलून धरायच्या हे तिसरी व्यक्ती ठरवू शकत नाही हे सपशेल मान्य करून आम्ही कोणाला सुचवायला, सांगायला जात नाही; मात्र कोण काय पाहतं यावरून त्यांच्या ‘रसिकते’चा दर्जा ठरवला जाणार असेल तर मात्र या बालिश दृष्टीकोनाची कीव करावी तितकी कमी आहे! येताजाता हॉलिवूडच्या मारामाऱ्यांत, सॉरी ‘अॅक्शन’, बघणाऱ्या लोकांना ‘ढिशूम ढिशूम’ आवाजामागचा निरागसपणा (इनोसन्स) कळणार नाही. नाक-तोंड-डोळ्यातून रक्त गाळत स्क्रीनवर येणारी भुतं पाहणाऱ्यांना ’13 B’ सारख्या बॉलिवूड चित्रपटाचं भयावह वातावरण झेपणारच नाही. त्यांनी आमच्या क्षमतेबद्दल शंका घेण्याऐवजी त्यांच्या अभिरुचीची आम्हांलाच दया यावी.

या उदाहरणांवरून त्यांची प्रतिभा तपासणं किंवा त्यावर काही टिप्पणी करणं हा उद्देश नसून त्यांच्या मानसशास्त्राच्या खोलात जायचा हा प्रयत्न आहे. खरं बघायला गेलं तर या तथाकथित ‘पॉप्युलर’ मालिका आणि चित्रपटांच्या फॅन्सपैकी अनेकजण असे आहेत ज्यांना त्यात फारसा काही प्रचंड रस नसतो. मित्र-मैत्रिणी बघतात म्हणून तेही या मालिका आणि चित्रपट बघतात आणि त्यांच्यासोबत आनंद घेतात. वास्तवात या चित्रपट किंवा मालिकांनी त्यांच्या आयुष्यावर काडी इतकाही परिणाम होणार नसतो. मात्र त्यांना यांपैकी कशाबद्दल प्रचंड कौतुकही नसतं किंवा तक्रारही नसते. त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत त्यांना वेळ घालवायला मिळणं यातच त्यांना रस असतो आणि ते यातून साध्य होत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. मात्र अगदी ‘कट्टरतावादी’ फॅन्सना या चित्रपट किंवा मालिकांबद्दल एक अवाक्षरही वाकडं बोललेलं चालत नाही. हे केवळ चित्रपट किंवा मालिका नव्हे तर हॅरी पॉटरची पुस्तकं, फिफाच्या मॅचेस अशा इतरही अनेक गोष्टींना लागू होतं. यांच्या फॅन्सचं कट्टर ‘फॅनत्व’ त्या फॅन्सना ढाल बनायला लावतं आणि त्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीवर ‘डिफेन्स’ सुरू होतो. हा बचावात्मक पवित्रा इतक्या टोकाला जातो की फॅन्स नसणाऱ्यात प्रत्येकावर वैयक्तिक टीका करायलाही ते कमी करत नाहीत. अनेकदा जेव्हा त्यांना अभिमान असलेल्या या गोष्टींमधल्या काही खरोखरच्या चुका किंवा उणिवा दाखवल्या जातात तेव्हा ते समोरच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा मार्ग अवलंबतात. त्यांचे सगळे मुद्दे हाणून पाडले गेले की सगळ्या चर्चेलाच ते अर्थहीन ठरवून मोकळे होतात. पाश्चात्त्य संस्कृतीचे ते इतके फॅन का होतात किंवा ते योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही. मात्र त्या संस्कृतीचा आणि त्यांच्या कलाकृतीचा (?) अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखण्याइतके त्याच्या आहारी का जातात हा खरा चर्चेचा मुद्दा आहे. समोरचा माणूस काय पाहतो यावरून त्याची बौद्धिक क्षमता, अभिरुची, प्रतिभा, रसिकता, इत्यादि ठरवण्याची शिकवण ही याच पाश्चात्त्य संस्कृतीची देणगी असावी. एखाद्याचे कपडे पाहून त्याची ऐपत ठरवण्याची ही ब्रिटीश मानसिकता या फॅन्समध्ये खोलवर रुजलेली दिसते. पात्रांचेकपडे आणि वेशभूषा, राहणीमान, इत्यादी दिखाऊ गोष्टीही त्यांच्या निवडीचे मापदंड ठरतात. त्यामुळे साहजिकच आपल्याकडचे ‘साधी माणसं’सारखे मराठी जुने किंवा ‘नारबाची वाडी’सारखे मराठी नवीन आणि ‘श्री ४२०’सारखे हिंदी जुने किंवा ‘सिंघम’सारखे हिंदी नवीन साधेपणाने आणि निरागस भावाने बनलेले पूर्णतः मनोरंजक चित्रपट या तथाकथित बुद्धिवादी रसिकांना आवडण्याची, खरं तर झेपण्याची, शक्यताच नाही.

त्यांच्या फॅनत्वाचा अपमान म्हणून नव्हे तर त्यांच्या या संकुचित मानसिकतेची दया येऊन सहानुभूती म्हणून हा लेखाचा घाट घातला आहे. त्यांची हीच मनोवृत्ती अधिक ब्रॉड, खुली, सर्वसमावेशक, विस्तारीत व्हावी म्हणून त्यांना ‘आपल्याकडचंही काही पहा’असा सल्ला दिल्यावर त्याला देशाभिमानाचं लेबल चिकटवून ते मोकळे होतात आणि ‘आपल्या देशात कुठे काय चांगलं बनतं’असं म्हणून सोयीस्कररित्या पाठ फिरवतात. ‘चांगलं’ हा शब्द आणि त्याची व्याख्या हिच मुळात व्यक्तिसापेक्ष आहे हे या पामरांना कोणी समजावावं? बाकी गेम ऑफ थ्रॉन्सच्या उर्वरित भागांसाठी तुम्हाला शुभेच्छा. स्पॉयलर्समुळे तुमच्या प्लॅनची वाट लागू नये हिच इश्वरचरणी प्रार्थना…

( सौजन्य: ‘लोकप्रभा’)