बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला न्यायालयाने दणका दिला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एसीजेएम न्यायालयाने सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. पैसे घेऊनही इव्हेंटला न आल्याबद्दल सोनाक्षीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताज्या अहवालानुसार, सोनाक्षीला २०१९च्या फसवणूक प्रकरणात पुढील महिन्यात उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सोनाक्षीवर प्रमोद शर्मा नावाच्या एका कार्यक्रम आयोजकाने फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.
रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीला दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी २८ लाख रुपये आगाऊ दिले गेले होते. या कार्यक्रमासाठी ती प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होती. मात्र, आगाऊ रक्कम घेऊनही सोनाक्षी या कार्यक्रमाला हजर राहिली नाही. त्यानंतर, २०१९ साली या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी पैसे परत घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. अखेरी त्यांनी सोनाक्षी सिन्हाविरुद्ध तक्रार दाखल केली.
“एक स्वप्न आहे, जे माझ्या मनात…” ६७व्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा
आता, मुरादाबाद कोर्टाने फसवणूक प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. इतकेच नाही तर न्यायालयाने सोनाक्षीला २५ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
आधीच्या वृत्तानुसार, दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने या कार्यक्रमासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र, कार्यक्रमाच्या दिवशी सोनाक्षीच्या टीमने कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. आयोजकांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यामुळे सोनाक्षीने या कार्यक्रमात हजेरी लावली नाही.