गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. या चर्चा जॅकलिनचा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या. या प्रकरणी वेगवेगळी माहिती सतत समोर येत आहे. आता या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचेही नाव जोडले गेले आहे. सुकेश आणि नोराचे पर्सनल चॅट समोर आले आहे.
नोराने सुकेशकडून महागडे आणि लग्झरी गिफ्ट घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. आता त्या दोघांचे प्रायवेट व्हॉट्स अॅप चॅट समोर आले आहे. चॅटमध्ये सुकेश महागडे गिफ्ट देण्याबाबत बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे नोराने गिफ्ट स्वीकारणार असल्याचे म्हटले.
आणखी वाचा : सुकेश चंद्रशेखर जॅकलिनसाठी चक्क ५०० कोटी रुपये खर्च करुन करणार होता ‘ही’ गोष्ट
इंडिया टूडने दिलेल्या वृत्तानुसार, सुकेशने नोरा फतेहीला महागडे आणि लग्झरी गिफ्ट दिले आहे. लीक झालेल्या चॅटमध्ये सुकेश नोराला विचारत होता की तिला रेंज रोवर गाडी आवडते का? त्यावर उत्तर देत नोराने ‘हो, ती एक चांगली गाडी आहे’ असे म्हटले होते. त्यावर सुकेशने ‘मी तुला आणखी काही पर्याय देतो’ असे म्हटल्याचे चॅटमधून समोर आले आहे.
दुसऱ्या एका चॅटमध्ये ‘जर तू एक मिनिट माझ्याशी संवाद साधलास तर मला आनंद होईल आणि त्यासाठी मी तुझी वाट पाहिन. मला आशा आहे की मी गिफ्ट का देत आहे असा विचार करत नसाल. हे गिफ्ट देण्यामागे माझा कोणताही चुकीचा हेतू नाही. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्ही तिला गिफ्ट देता. म्हणून मी तुम्हाला हे गिफ्ट देत आहे’ सुकेशने असे म्हटले आहे.