प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या फिफा विश्वचषक २०२२ साठी कतारमध्ये आहे. तिथे डान्स परफॉर्म करत असलेल्या नोरा फतेहीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने देशाचं नाव मोठं केलं असं म्हणत एकीकडे नेटकरी तिचं कौतुक करत असताना तिचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे नोरा फतेहीवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण यावेळी तिच्याकडून एक चूक झाली. ज्यावर नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसत आहेत.
नोरा फतेहीने फिफा विश्वचषक २०२२मध्ये भारतातचं प्रतिनिधीत्व करत ‘लाइट द स्काई अँथम’ या गाण्यावर परफॉर्म केलं. नोरा फतेहीने यावेळी ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या आणि स्टेजवर हातात तिरंगा घेऊन तो अभिमानाने फडकवतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये नोरा फतेही डान्स परफॉर्मन्सनंतर तिरंगा फडकवताना दिसत आहे. तसेच ती ‘जय हिंद’च्या घोषणाही देत आहे. तिच्याबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकांनीही ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण याच व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी नोराची चूक पकडली आहे. नोराने उत्साहाच्या भरात तिरंगा उलटा पकडला होता. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
आणखी वाचा- नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
नोरा फतेहीने तिरंगा उलट दिशेने म्हणजे हिरव्या रंग सर्वात वर असलेल्या दिशेने पकडला होता. एवढंच नाही तर तिरंगा उचलत असतानाही चुकीच्या पद्धतीने उचलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर तिने तो एका व्यक्तीच्या दिशेने फेकलेला दिसत आहे. नोराचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही आणि त्यांनी त्यावरून तिच्यावर टीका केली आहे. नेटकऱ्यांनी नोरावर राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने उचलणे, उलटा पकडणे आणि नंतर फेकून त्याचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे. यावरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.
आणखी वाचा- प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”
दरम्यान नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर फिफा विश्वचषक २०२२चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “जेव्हा विश्वचषक सुरू असलेल्या स्टेडियममध्ये तुमच्या आवाजातलं गाणं वाजतं. हा क्षण खूपच भारी होता. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. याची मी माझ्या स्वप्नांमध्ये अनेकदा कल्पना केली होती. हे स्वप्न आज पूर्ण झालं.”