बॉलिवूडची आयटम नंबर करणारी आघाडीची अभिनेत्री नोरा फतेहीने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली आहे. सुकेश प्रकरणात मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची चौकशी सुरु आहे. मंगळवारी पतियाळा कोर्टात नोरा आणि जॅकलिनचा जबाब नोंदविला गेला. त्यात नोराने सुकेशने तिला दिलेल्या ऑफरबद्दल सांगितले आहे. सुकेश अभिनेत्रींना ऐषोआरामात जगण्याचे स्वप्न दाखवून स्वतःच्या जाळ्यात ओढत असल्याचे दोघींनी म्हटले आहे. दोघींनीही सुकेशवर गंभीर आरोप लावले आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार नोराने सांगितले की, पिंकी ईरानी नावाच्या मैत्रिणीकडून सुकेश नोराला ऑफर देत होता. सुकेशने नोराला मोठं घर आणि ऐषोआरामात जगण्यासाठी सर्व काही देईल, असे सांगितले. मात्र तिला सुकेशची गर्लफ्रेंड बनावी लागेल, असा प्रस्ताव सुकेशने तिच्यासमोर ठेवला होता. पिंकी सुकेशच्यावतीने नोराला गळ घालत होती. तसेच सुकेशला हो म्हण नाहीतर जॅकलिन देखील रांगेत आहेच, असे सांगून तिची समजूत काढत असे, अशी माहिती नोराच्या जबाबातून पुढे आली आहे.
हे वाचा >> नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; नेमकं प्रकरण काय?
नोराने सांगितले की, सुकेश हा भामटा असल्याचे तिला माहीत नव्हते. तिचा आणि सुकेशचा कधी थेट संपर्क झाला नव्हता, असा दावा नोराने केला आहे. सुकेश पिंकीच्या माध्यमातून तिच्याशी बोलायचा. नोराने दावा केला आहे की जेव्हा सुकेशला आणि तिला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले तेव्हा पहिल्यांदा ते दोघे एकमेकांना समोरासमोर पाहत होते. तोपर्यंत तिला सुकेशच्या फसवणुकीच्या प्रकरणांबाबत माहीत नव्हते.
जॅकलीन फर्नांडिजनेही सुकेशवर गंभीर आरोप लावले आहेत. तिलाही सुकेशने ऐषोआरामाचे जीवन देईल, असे आमिष दाखविले होते. जैकलिनला देखील पिंकीनेच सुकेशबद्दल सांगितले होते. सुकेश गृह मंत्रालयातला अधिकारी असल्याचे भासवून पिंकीने त्याची जॅकलिनसोबत गाठ घालून दिली होती. तसेच सुकेश जयललिताच्या कुटुंबातील असून तो सन टीव्हीचा मालक असल्याचीही थाप पिंकीने मारली होती. सुकेश सन टीव्हीचा मालक असल्यामुळे त्याच्याकडे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, ज्यामध्ये तो जॅकलिनला घेऊ इच्छितो. जॅकलिनसोबत अनेकवेळा व्हिडिओ कॉलवर बोलायचा, याकाळात त्याच्या फसवेगिरीचा जॅकलिनला अनुभव आला नाही.
सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.