विदूषक म्हणजे विचित्र चाळे करणारा, पडत धडपडत, मार खात सर्वाना हसवणारा सर्कशीतला ठेंगणा, रंगीबेरंगी कपडे घातलेला माणूस डोळ्यासमोर येतो. तो बहुतेक उपेक्षित राहणारा आणि सर्कशीतील अशिक्षित माणूस मानला जातो. त्यामुळे सर्कशीत आणि बाहेरही त्याला फारसा मान त्याला मिळत नाही. पण हाच विदूषक जेव्हा परदेशात जाऊन आपल्या व्यवसायाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन येतो तेव्हा मात्र लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून जातो.
ही कथा आहे मुंबईच्या मार्टिन डिसुझा यांची. मार्टिन यांनी २४ वर्षांपुर्वी विदुषकाचा व्यवसाय पत्करून अमेरिकेत त्या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. तेथून भारतात परतल्यावर त्यांनी विदुषकी पेशाच स्वीकारला. आज मार्टिन पेशाने फक्त विदुषकच नाही आहेत, तर ते स्वत:च्या कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही करतात. नुकत्याच शिकागोमध्ये पार पडलेल्या ‘इंटरनॅशनल क्लाउन कन्व्होकेशन’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. दरवर्षी ते भारतात ‘इंटरनॅशनल क्लाउन फेस्टिव्हल’चे आयोजन करतात. त्यात जगभरातील विदुषक सहभागी होतात. येत्या १७ आणि १८ मेला मार्टिन मुंबईमध्ये ‘फबल्स अँड फेन्ड्स’ हा त्यांचा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकाच्या भेटीस येणार आहेत.
विदूषक खरं पाहता अन्य कलाकारांप्रमाणेच एक कलाकार आहे. सर्कशीतील अशिक्षित जोकर आणि प्रशिक्षित विदूषक यांच्यात मूलभूत फरक असतो. प्रशिक्षित विदूषक ज्या करामती दाखवतो त्यांचे त्याने प्रशिक्षण घेतलेले असते. तो कधी गोंधळलेला, चुकलेला किंवा अडखळलेला दिसतो. पण ते केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी असते. तो कोणाला दुखवून, चिडवून, त्रास देऊन विनोदनिर्मिती करत नाही. त्याचे विनोद प्रासंगिक असतात, असे मत मार्टिन यांनी व्यक्त केले.
मनोरंजन क्षेत्रात करियर करण्याच्या उद्दिष्टाने मार्टिन यांनी २४ वर्षांपूर्वी अँकरिंग करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांना विदुषकी पेशात आपला सुर सापडला. प्रेक्षकांचा विदुषकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. पूर्वी आपल्याकडे विदूषक हा चेष्टेचा विषय होता. पालक मुलांना आम्हाला मारायला, चिडवायला सांगत. पण आता ही परिस्थिती बदलते आहे. आम्हा प्रशिक्षित विदुषकांकडे मानाने पाहिले जाते. कित्येकदा मुले कार्यक्रमानंतर आम्हाला मिठी मारतात. वाहतुकीचे नियम, चांगल्या वागणुकीचे धडे शिक्षकांकडून घेण्यापेक्षा आमच्याकडून घ्यायला त्यांना आवडतं. त्यांच्या या प्रतिसादामुळे आम्हालाही काम करण्यास हुरूप येतो, असे मार्टिन यांनी बोलून दाखवले.