चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कलाकारांनादेखील सर्वसामान्यांच्या आयुष्यात असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतातच. अभिनेत्रींच्या बाबतीत तर लग्नानंतर त्यांचे आयुष्यच बदलून जाते. प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाबतीतदेखील असेच झाल्याचे दिसून येते. २००९ साली शिल्पा आणि राज कुंद्राचे लग्न झाले आणि मुलगा विवानच्या येण्याने त्यांच्या सुखी संसाराचा आनंद द्विगुणीत झाला. विवान अद्याप खूप लहान असल्याने सध्या तरी चित्रपटांमधून भूमिका साकारण्यात रस नसल्याचं तिचं म्हणणं आहे. आपला संपूर्ण वेळ विवानच्या संगोपनासाठी देऊन मातृत्वाचा आनंद घेत असल्याचंही ती पुढे म्हणाली.
दरम्यान, आहार आणि आरोग्यावर पुस्तक लिहिण्याचे काम तिने हाती घेतले आहे. लहानपणापासून माझी शरीरयष्टी किरकोळ आहे, असा लोकांचा समज आहे. परंतू ते सत्य नाही. सदृढ आणि बांधेसूद शरीरयष्टी कमाविण्यासाठी मी पुष्कळ मेहनत घेतली असून, त्यामुळेच या पुस्तकाच्या लिखाणास सुरुवात केल्याची माहिती तिने दिली. याचवर्षी पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा तिचा मानस आहे.

Story img Loader