शाहीद कपूर बॉलिवूडच्या या चॉकलेट बॉयचं जेव्हापासून करीनाबरोबर फिस्कटलंय तेव्हापासून विद्या बालन ते आत्ता सोनाक्षी सिन्हापर्यंत प्रत्येकाशी नाव जोडलं गेलं आहे. आज काय शाहीद प्रियांकाच्या प्रेमात आहे, म्हणजे विद्या बालनमुळे करीनाचं फिस्कटलं आणि प्रियांकामुळे विद्याबरोबर फिस्कटलं.. अशा चर्चा आता शाहीदलाही नव्या राहिलेल्या नाहीत. गेला बाजार नर्गिस फाखरीबरोबरही त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र, रिचा चढ्ढाबरोबर त्याचं नाव जोडलं गेल्यावर शाहीदचा पारा असा काही सटकला की त्याने तुम्ही काय चालवलंय काय?, असा उलट प्रश्न माध्यमांना विचारला आहे. रिचा चढ्ढाशी आपला कधीच संबंध आलेला नाही. वैयक्तिक काय कुठल्याही सामाजिक व्यासपीठावर किंवा कार्यक्रमातही आम्ही एकत्र आलेलो नाही. कुठल्यातरी पुरस्कार सोहळ्यात कोणीतरी तिची ओळख करून दिली असेल, एवढंच. आणि तरीसुध्दा तिच्याबरोबर माझं नाव कसं जोडलं जाऊ शकतं?, असा प्रश्न शाहीदने केला आहे. सध्या शाहीद आणि सोनाक्षीच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, शाहीद आणि सोनाक्षीने आता निदान एक चित्रपट एकत्र केला आहे. प्रमोशनच्या निमित्तानेही ते कित्येक वेळा एकत्र आले आहेत. त्यांची चांगली गट्टी जमली आहे. ते एकत्र फिरतात, गप्पा मारतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी आहे, अशी चर्चा सुरू झाली तर ती एकवेळ समजू शकतो. पण, ज्या रिचाला शाहीद ओळखतही नाही तिच्याशी त्याचं नाव जोडण्याचं कारण काय?, असा सूर शाहीदच्या मित्रमंडळींनी लावला आहे. ंमुळातच, शाहीद खूप मनमोकळ्या स्वभावाचा आहे. एखाद्याशी चांगली ओळख झाली, मैत्री झाली की त्यांच्याबरोबर बाहेर फिरणं, चित्रपच बघणं या गोष्टी तो सर्रास करतो. रात्री उशिरापर्यंत पार्टी करणं हेही सुरू असतं. पण, म्हणून त्याच्या या स्वभावामुळे कोणाबरोबरही त्याचं नाव जोडलं जाणं योग्य नाही, असं शाहीदच्या मित्रांचं म्हणणं आहे. म्हणजे, शाहीद असाच आहे हे सांगण्यासाठी ओढूनताणून रिचा चढ्ढासारख्या अभिनेत्रींबरोबर त्याचे नाव जोडले जाऊ नये, अशी भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली आहे. शाहीदनेही ‘गंदी बात..’ म्हणत या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

Story img Loader