नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी जेवढी उत्सुकता निर्माण केली, तेवढीच प्रदर्शनानंतर वादांची सुनामी आणली. ‘पीके’ चित्रपटाविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमीर खानचा अभिनय असलेल्या या चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावणी दरम्यान चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे म्हणत न्यायालयाने ही जनहित याचिका रद्द केली. चित्रपटात हिंदू देवतांवर अपमानास्पद शेरेबाजी करण्यात आल्याचे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखाविण्यात आल्याचा उल्लेख असलेली ही जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती आर. एस. एण्डलो यांच्या खंडपीठाने ‘चित्रपटात चुकीचं काय आहे?’ असा प्रश्न उपस्थित करत फेटाळली. चित्रपटात काहीही आक्षेपार्ह आढळून न आल्याने याचिकेत काहीही अर्थ नसल्याचा शेरादेखील न्यायालयाने मारला. गौतम यांनी दाखल केलेल्या याचिकेत हिंदू देवतांचे विडंबन करण्यात आले असून, भगवान शंकरचे अयोग्यप्रकारे सादरीकरण करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात हिंदूंच्या पुजापाठ करण्यावरदेखील टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमीर खान आणि अनुष्का शर्माचा अभिनय असलेल्या ‘पीके’ चित्रपटाने समीक्षकांची आणि चित्रपटप्रेमींची मने जिंकली असली, तरी चित्रपटातील हिंदूं देवदेवतांच्या सादरीकरणावरून हिंदू संघटनांचा रोष ओढवून घेतल्याचे दिसते आहे.

Story img Loader