गेले काही दिवस अनेक हॉलिवुड, बॉलिवुड कलाकारांना सोशल मीडिया साईट्सवरून पसरणाऱ्या अफवांचा बळी व्हावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी हॉलिवुड अभिनेता जॅकी चेन यांचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडिया साईट्सवरून फिरत होती. अखेर, जॅकी चेन यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना काहीही झाले नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते. असाच काहीसा प्रकार शनिवारी अभिनेता नाना पाटेकर यांच्याबाबतीत घडला. मात्र, एरव्ही खमकी उत्तरे देणारा नाना पाटेकरांसारखा अभिनेताही चाहत्यांच्या आणि निकटवर्तीयांच्या प्रेमाची प्रचिती आल्यामुळे हळवा झाला होता.  
नाना पाटेकर यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला, त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, अशाप्रकारची बातमी सोशल मीडियाच्या साईट्सवरून फिरत होती. त्यामुळे ही अफवा आहे की नानाला खरेच काही झाले, याची विचारणा त्यांच्या निकटवर्तीयांकडे होऊ लागली. अखेर, नाना पाटेकर यांनी स्वत:च एका वाहिनीशी संपर्क साधून आपल्याला काहीही झालेले नाही. आपण ठणठणीत आहोत, असा खुलासा केला.
आपणच लोकांना अटॅक देतो, अशा शब्दांत झाल्या प्रकारावर त्यांनी विनोदी टिप्पणीही केली. डबिंगच्या कामात व्यस्त असल्याने आपला फोन बंद होता त्यामुळे कदाचित कोणालातरी ही गंमत सुचली असावी, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. मात्र, झाल्या घटनेने लोक आपल्यावर किती प्रेम करतात, याचीही प्रचिती आल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा