‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक शशांक खैतानचा आगामी ‘धडक’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दलची उत्सुकत वाढली आहे. यामागचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे आणि दुसरं म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यातील ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची तुलना ‘सैराट’शी होऊ लागली आहे. पुढच्या शुक्रवारी म्हणजेच २० जुलै हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी नागराज मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा अशी इच्छा शशांक खैतानने व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागराज मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी याची प्रतीक्षा मी करत आहे असं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शशांक म्हणाला. मंजुळे आणि त्यांच्या टीमसाठी शशांक स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजनदेखील करणार आहे. त्याचप्रमाणे नकारात्मक प्रतिक्रियांनाही सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे असंही त्याने सांगितलं.

‘धडक’मधील ‘झिंगाट’ आणि ‘पहली बार’ या दोन गाण्यांना प्रेक्षकांकडून संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. ‘सैराट’च्या तुलनेत हा रिमेक फिका पडतोय असंही मत अनेकांनी नोंदवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ‘धडक’ कितपत आवडेल असा प्रश्नही निर्माण होत आहे. इशान खट्टर आणि जान्हवीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now i am waiting for nagraj manjule to see dhadak says shashank khaitan