संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाचा भव्यदिव्य सेट आणि त्यातील स्टारकास्ट दीपिका आणि रणवीर यांच्याबद्दल आपण बऱ्याच गप्पा ऐकल्या. पण आता या ‘रामलीला’च्या आयटम सॉंगने पुन्हा एकदा नवीन चर्चा घडवून आणलेली आहे. ‘रामलीला’साठी आयटम गर्ल म्हणून कोण काम करील, याच्या शोधात भन्साळी होते. अर्थात भन्साळी यांची पहिली पसंती ‘जोधा’ म्हणजेच ऐश्वर्या राय होती. परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि याजागी प्रियांका चोप्राची वर्णी लागली. ऐश्वर्याच्या जागी लागलेली ही प्रियांकाची वर्णी अनेकींच्या वर्मी लागली. वर्मी लागणाऱ्यांमध्ये अर्थातच बच्चन कुटुंबीयांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.
सध्या बॉलीवूडमध्ये आयटम सॉंगला खुपच उत्तम दिवस आले आहेत. आयटम सॉंगसाठी निर्माता काही लाख रुपये मोजायला तयार आहेत. समजा हे आयटम सॉंग नामांकित अभिनेत्रीवर किंवा अभिनेत्यावर चित्रीत होत असेल तर ही किंमत दुपट्टीमध्येही असते. कधी कधीही कोटींमध्येही जाते. अनेकदा चित्रपटांमध्ये नवीन इनिंग सुरु करण्यासाठी आयटम सॉंग हा एकमेव बेस्ट पर्याय ठरतो याचा उत्तम दाखला म्हणजे माधुरीने ‘ये जवानी हैं दिवानी’ मध्ये केलेले नृत्य. ऐश्वर्यानेही परत चित्रपटात येण्यासाठी हाच रस्ता निवडला. आयटम सॉंग करण्यासाठी ती तयार झाली. (‘कजरा रे..’ या बंटी और बबली चित्रपटानंतर बऱ्याच कालावधीनंतर) पण ऐनवेळी प्रियांकाने मात्र मागून येऊन संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’मध्ये शिरकाव केला. ऐश्वर्याची या आयटम सॉँगसंदर्भात भन्साळींशी अंतिम बोलणीही झाली होती. तरीही ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे मात्र ऐश्वर्याला माघार घ्यावी लागली आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘गुंडे’, ‘मेरी कोम’ या चित्रपटांमध्ये सध्या प्रियांका व्यस्त आहे. या व्यस्त वेळापत्रकामधूनही तिने वेळ काढून ‘रामलीला’तील आयटम सॉँग करण्यास होकार दिला. सध्या प्रियांकाची चलती पाहता संजय लीला भन्साळीही तिला नाही म्हणू शकले नाहीत. त्यामुळेच सध्या या दोन अभिनेत्रींमधील शीतयुद्धाची चर्चा हा बॉलीवूडमध्ये खुसखुशीत चर्चेचा विषय झालेला आहे.