बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून, बॉलिवूडमधील तो पहिलाच असा सेलिब्रिटी ठरला आहे ज्याला भारतातील त्याचे चाहते ‘डायल टू फॉलो हिम ऑन ट्विटर’ या सुविधेचा वापर करून फोनद्वारे संपर्क साधू शकतील.
शाहरुखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडत प्रचंड यशस्वी ठरला. ट्विटर आणि झिपडायलने एकत्रितपणे सुरू केलेल्या सुविधेद्वारे शाहरूखचे भारतातील चाहते एसएसएसद्वारे शाहरुखच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्याशी संपर्कात राहू शकतील. जगभरात माझे असंख्य चाहते असून, त्यांच्यावरील प्रेमाखातर आपण ही सुविधा सुरू करत असल्याचे शाहरुख म्हणाला.
भारतातील मोबाईलधारक ०९०१५५००५५५ या क्रमांकावर फोन करून अथवा मिसकॉल देवून @iamsrk या शाहरुखच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्याशी संपर्कात राहू शकतील. ही सुविधा मोफत असून, भारतातील कोणत्याही मोबाईल फोन अथवा मोबाईल नेटवर्कवरून ती वापरता येईल. त्याचप्रमाणे या सुविधेचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याचे ट्विटर अकाऊंट असणे गरजेचे नसून, डाटा अनेबल्ड मोबाईल फोनचीसुद्धा आवश्यकता नाही.
या सुविधेबाबत बोलताना शाहरुख म्हणाला, तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर माझा नेहमीच विश्वास राहिला असून, याचा वापर करून विविध मार्गांनी मी सतत चाहत्यांशी संपर्कात राहू शकतो. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ट्विटर हे माझ्यासाठी खूपच उपयुक्त ठरले आहे. मला आशा आहे की माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी भारतातील माझे चाहते आम्ही सुरू केलेल्या या नवीन सुविधेचा वापर करतील. या नाविन्यपूर्ण सुविधेची सुरुवात माझ्यापासून करण्यासाठी आणि ज्यांच्याकडे ट्विटर अकाऊंट नाही, अशा भारतभरातील माझ्या चाहत्यांना माझ्याशी संपर्कात आणण्यासाठी मी झिपडायल आणि ट्विटरचे आभार मानतो. लवकरच ही सुविधा अनेक देश, भाषा आणि संपर्क साधण्याच्या उपकरणात उपलब्ध होईल, अशी आशा शाहरुखने व्यक्त केली.
ट्विटर हे जगातील अघाडीचे संपर्काचे साधन असून, अनेक लोक आपल्या आवडीच्या व्यक्ती आणि संस्थेशी ट्विटरवरून संपर्कात असतात. भारतामध्ये ट्विटर अन्य गोष्टींबरोबरच भारतीय व्यक्तीला त्याच्या आवडत्या कलाकाराशी आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संपर्कात राहाण्यात मदत करते. शाहरुख खान आणि झिपडायलने ट्विटर सुविधेचा अशाप्रकारे केलेला उपयोग पाहून आपल्याला आनंद होत असल्याचे ट्विटर इंडियाचे ऋषी जेटली म्हणाले.
शाहरुख खान आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी ही सुविधा पुरविण्यात आम्हाला खूप आनंद होत असल्याचे झिपडायलचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी वालेरिए वागोनेर म्हणाले.
झिपडायल आणि ट्विटर संयुक्तरपणे ही सुविधा पुरवत असून, ०९०१५५००५५५ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यावर कोणत्याही प्रकारच्या दर आकारणी शिवाय शाहरूख खानचे सर्व ट्विटस् एसएमएसद्वारे तुमच्या मोबाईलवर दाखल होतील.

Story img Loader