‘एफटीआयआय’च्या शुल्कवाढीवरून अनुपम खेर यांचे स्वानुभव कथन
जीवनात सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. त्या तशा सोप्या असूही नयेत. मात्र, प्रतिकूलतेवर मात करून ज्याला जे करायचे ते तो साध्य करतो, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते आणि ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी संस्थेतील अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीचे समर्थन केले.
‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमांतर्गत अनुपम खेर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीचे संपादक अमिताभ सिन्हा यांनी त्यांचे स्वागत केले.
‘एफटीआयआय’मधील अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीकडे लक्ष वेधले असता खेर यांनी व्यक्तिगत जीवनातील दाखला दिला. चंदीगड येथील ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी मला जायचे होते. मी आई जेथे पैसे ठेवते तेथून शंभर रुपये उचलले आणि चंदीगडला जाऊन आलो. घरी परतलो तर दरवाजामध्ये पोलीस उभे होते. ड्रामा स्कूलमध्ये माझी निवड झाली असल्याचे दोन दिवसांनी वडिलांनी सांगितले, तेव्हा तुझ्याकडे पैसे कोठून आले, असे आईने विचारले. मग मी खरे काय ते सांगून टाकले. तेथील शुल्क मला त्या काळात परवडणारे नव्हेत. पण, तरीही ड्रामा स्कूलमध्ये दाखल झालो. हा किस्सा सांगून खेर यांनी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात असे भाष्य केले. एफटीआयआय अभ्यासक्रमांचे शुल्क जास्त आहे असे म्हणत असताना ज्याला शिक्षण घेऊन कारकीर्द घडवायची आहे ते तो साध्य करतोच, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पत्नी किरण खेर भाजपची खासदार असली, तरी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. सच्चा राष्ट्रभक्त आहे. विद्यार्थी शिकण्यासाठी, कला आत्मसात करण्यासाठी येतात. एफटीआयआय येथे आल्यानंतर मी विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्यासमवेत भोजन घेतले. मोठे अध्यापक येथे अध्यापनासाठी यावेत हा माझा प्रयत्न असेल. उद्देश चांगला असेल, तर काम करताना अडचण येत नाही. त्यामुळे संस्थेचा लौकिक वाढविण्यावर मी भर देणार असल्याचे ते म्हणाले.