तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ मागच्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला बिझनेसमन निखिल जैनसोबत झालेलं लग्न अमान्य करत वेगळं होणं आणि त्यानंतर अभिनेता यश दासगुप्ताशी तिची वाढलेली जवळीक. या सर्वच गोष्टींमुळे ती सतत चर्चेत राहिली. एवढंच नाही तर जेव्हा ती प्रेग्नन्ट असल्याचं वृत्त सगळीकडे पसरलं. तेव्हा तिच्या बाळाचे वडील कोण? यश दासगुप्ताशी तिचं नातं काय? अशा प्रकारचे बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. अर्थात यावर बोलणं नुसरतनं नेहमीच टाळलं होतं. पण आता तिनं यश दासगुप्तासोबतचं नातं मान्य करत याची सुरुवात कशी झाली याचा मोठा खुलासा देखील केला आहे.
नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी रेडिओ शो ‘इश्क विथ नुसरत’मध्ये त्यांच्या नात्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर या शोमध्ये त्यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुलीही दिली आहे. या शोमध्ये नुसरतनं, यशसोबतच्या नात्याची सुरुवात कशी झाली? तिच्यासाठी प्रेमाचं महत्त्व काय आहे? अशा आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
या शोमध्ये नुसरत आणि यशच्या लव्ह स्टोरीबाबत विचारण्यात आल्यावर यशनं नुसरतला याचं उत्तर देण्यास सांगितलं. त्यानं तिला विचारलं, ‘हे सर्व कसं सुरू झालं?’ या प्रश्नाचं उत्तर देताना नुसरत म्हणाली, ‘मी तुझ्यासोबत पळून गेले होते.’ त्यावर यश म्हणतो, ‘तू पळून गेली होतीस? तुझं म्हणणं आहे की, आपण दोघं एकमेकांचा हात पकडून रस्त्यावर पळत होतो?’ यशच्या बोलण्यावर नुसरत म्हणते, ‘नाही, नाही. मी तुझ्यासोबत फरार झाले होते. असं म्हणणं अधिक चांगलं ठरेल. हो, मी तुझ्यासोबत फरार झाले होते.’
नुसरतनं या एपिसोडमध्ये बरेच खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की, ‘हा एपिसोड ‘माझं प्रेम, माझी निवड’ यावर आधारित आहे. मी तुझ्या प्रेमात पडले आहे आणि ही माझी निवड आहे. बाकी सर्व तर फक्त भूतकाळ आहे.’ यानंतर यशनं तिला प्रश्न विचारला, ‘तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे?’ यशच्या प्रश्नाचं उत्तर देताना नुसरत म्हणाली, ‘एकमेकांसोबत राहणं नेहमीच आनंददायी असतं. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. प्रेम ही सर्वात कठीण गोष्ट आहे. पण तरीही प्रेम असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकता.’
दरम्यान नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांशी लग्न केलंय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तर त्या दोघांनी लग्न केलं आहे असं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी नुसरतनं इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘पती आणि वडील’ असं लिहिलं होतं. याशिवाय तिचा मुलगा इशानच्या जन्म प्रमाणपत्रावरही यशचं नाव आहे. तिच्या डिलिव्हरीच्या वेळीही यश तिच्यासोबत राहून तिची काळजी घेताना दिसला होता.