बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुसरत आई झाली आहे. पण त्याआधी ती पती निखिल जैनपासून वेगळी झाली होती. ‘निखिलशी भारतीय कायद्यानुसार लग्न केलं नसल्यामुळे त्याला घटस्फोट देण्याचा प्रश्नच येत नाही’ असं नुसरतनं त्यावेळी म्हटलं होतं. त्यामुळे नुसरतच्या प्रेग्नन्सीनंतर तिच्या बाळाचे वडील कोण आहेत यावरून बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.
दरम्यानच्या काळात नुसरत जहां आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्यातील जवळीक वाढल्याचंही बोललं गेलं होतं. या प्रकरणावरून नुसरतला बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. पण जेव्हा बाळाचं जन्म प्रमाणपत्र समोर आल्यानंतर यशच तिच्या बाळाचे वडील असल्याचं स्पष्ट झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नुसरतनं यावर मोकळेपणानं चर्चा केली.
नुसरत जहानं तिचा चॅट शो ‘इश्क विथ नुसरत’मध्ये तिच्या मातृत्वाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रेग्नन्सीदरम्यान तिच्या शरीरात झालेले बदल आणि मुलगा इशानचे वडील यांसह इतर अनेक गोष्टींचा खुलासा केला. या चॅटशोमध्ये बोलताना नुसरत म्हणाली, ‘मी एकटी आई नाही आहे. माझा मुलगा इशानकडे सामान्य आई- वडील आहेत. मी बाळाला जन्म देऊन कोणतीही चूक केलेली नाही. हा माझ्या आयुष्यातला एक चांगला निर्णय होता.’
नुसरत पुढे म्हणाली, ‘मी हा निर्णय घेऊन कोणतीही चूक केली असं मला वाटत नाही. कारण हे माझं आयुष्य आहे. अनेकांना माझा निर्णय साहसी वाटू शकतो. पण हा माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय होता. मी यावर कधीच काही बोलले नाही कारण मला माझ्या आयुष्यात शांतता हवी होती. लोकांनी यावर बऱ्याच गोष्टी बोलल्या आहेत त्यामुळे मी आता यावर भाष्य करत आहे. मी खूप बोल्ड आहे आणि मला माझ्या आई होण्याच्या निर्णयाचा अभिमान आहे.’