राजकुमार हिरानी दिग्दर्शित पीके चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी साधारणत: दोन तास हा गोंधळ झाला. सकाळी दहाच्या सुमारास चित्रीकरण करणारे १०० कर्मचाऱ्यांचे पथक मंदिर प्रांगणात दाखल झाले. त्यांच्याकरवी कॅमेरा व तत्सम साहित्य बसविण्याचे काम सुरू झाले. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह आसपासच्या नागरिकांना चित्रीकरणाची चाहुल लागली. ही बाब काही विश्वस्तांपर्यंत पोहोचली. विश्वस्त अॅड. अजय निकम यांनी युनिटकडे लेखी परवानगी नसल्यावरून आक्षेप घेतला. या परवानगीसाठी युनिटच्या व्यवस्थापकाने आदल्या दिवशी देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला होता. श्री काळाराम मंदिरात चित्रपटांचे चित्रीकरण नेहमी होत असते. यामुळे संबंधितांना रितसर परवानगी देण्यात आली. परंतु, ही बाब काही विश्वस्तांना माहित नसल्यामुळे गोंधळ झाल्याचे विश्वस्त गिरीश पुजारी यांनी सांगितले. वास्तविक, देवस्थानची ही प्रशासकीय बाब आहे. नवीन विश्वस्तांना त्याबाबत कल्पना नव्हती. परवानगी देताना आम्हाला कळविले नाही असे आक्षेप घेणाऱ्या विश्वस्तांचे म्हणणे होते, असे पुजारी यांनी नमूद केले.
चित्रीकरण परवानगीसाठी संपर्क साधताना युनिटने देवस्थानला २५ हजार रुपयांची देणगी दिली. परंतु, अशी देणगी घेऊन चित्रीकरणास परवानगी देण्याची पध्दत नसल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले. मंदिर प्रांगणात चित्रीकरण व छायाचित्र काढण्यास र्निबध असल्याचे फलक आहेत. लेखी परवानगी न घेता चुकीच्या प्रथा पडू नयेत असा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रीकरणाची संपूर्ण तयारी झाल्यावर हा गोंधळ झाला. दरम्यानच्या काळात अभिनेता अमिर खान याचेही आगमन झाले. त्याने विश्वस्तांची सदिच्छा भेट घेतली. या चित्रीकरणामुळे काळाराम मंदिरास देशात व परदेशात प्रसिध्दी मिळणार असल्याने अखेरीस चित्रीकरणास तत्वत: मान्यता देण्यात आली. पुढील अर्धा ते पाऊस तासात अमिर खान मंदिरात दर्शन घेत असल्याच्या दृश्याचे चित्रीकरण झाले.
यावेळी खासगी सुरक्षारक्षक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुद्द अमिरखान दाखल झाल्याचे समजल्यानंतर युवक-युवतींसह परिसरातील नागरिकांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली. गर्दीचे व्यवस्थापन करताना पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. चित्रीकरणावेळी निर्माण झालेल्या या वादंगावर अमिर खानने कोणतीही टिपण्णी केली नाही. पुढील दोन दिवस रामकुंड व शहरातील इतर काही भागात चित्रीकरण होणार असल्याचे युनिट व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा