दरवेळी नव्या मालिकेसोबत वाहिन्या नायक-नायिकांच्या रूपात लोकांसमोर नवा चेहरा आणतात. त्यामुळे यापूर्वी मालिकांमधून यशस्वी झालेल्या कलाकारांना नव्या मालिकांमध्ये साहाय्यक भूमिकांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे कित्येक टीव्ही कलाकारांनी ठरावीक मालिका केल्यानंतर टीव्हीला विश्रांती देत बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या नव्या मालिकांमध्ये वाहिन्यांनी नव्या चेहऱ्यांपेक्षा जुन्या, प्रस्थापित चेहऱ्यांना मुख्य भूमिकेत घेण्यास सुरवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात नव्या चेहऱ्यांसोबत सुरू झालेल्या मालिका कमी टीआरपीमुळे बंद कराव्या लागल्या आहेत त्यामुळे कमी नव्या चेहऱ्यांना लोकप्रिय होण्यासाठी लागणारा वेळ गुंतविण्यापेक्षा जुन्या, लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या चेहऱ्यांना घेऊन मालिका बनविण्यात निर्माते पसंती देऊ लागले आहेत.

नव्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच टीव्हीवरील मालिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मागच्या वर्षी अमिताभ बच्चनपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत कित्येक बॉलिवूड कलाकारांना घेऊन बनविलेल्या मालिका टीव्हीवर यशस्वी ठरू शकल्या नाहीत, तर दुसरीकडे नव्या मालिकासोबत पदापर्ण करणारे नवे चेहरे हे टीव्हीचे हुकमी एक्के असतात. पण त्यांनाही यंदा फारसे यश मिळाले नाही. नव्या चेहरे मुख्य भूमिकांमध्ये असलेल्या ‘एव्हरेस्ट’, ‘नीशा और उसके कझिन्स’, ‘हमसफर्स’, ‘तेरे शहर में’सारख्या मालिका हिंदीमध्ये फारशा यशस्वी ठरल्या नाहीत. त्यामुळे हिंदी वाहिन्यांनी पुन्हा एकदा जुन्या कलाकारांना घेऊन मालिका तयार करू लागले आहेत. राम कपूर, रोहित रॉय, सई देवधर, शक्ती आनंद, वरुण आणि राजश्री बडोला, कृतिका काम्रा, राजेश खंडेवाल यांसारख्या मालिकांमधून यशस्वी ठरलेल्या चेहऱ्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मालिका सध्या टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘दिल की बातें’, ‘रिपोटर्स’, ‘इतना करो ना मुझसे प्यार’, ‘उडान’, ‘मेरे अंगने में’ या मालिकांचा समावेश आहे. या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या मालिकांमध्ये कामे केली आहेत. त्यामुळे हे चेहरे प्रेक्षकांमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नेहमीच्या प्रेमकथा, कौटुंबिक मालिकांऐवजी नवे विषय हाताळता येतात. नव्या कलाकारांची फी यांच्या तुलनेने कमी असते. तसेच त्यांच्या तारखांचा गोंधळही नसतो. त्यामुळे निर्मात्यांची पसंती नव्या कलाकारांना असते. पण सध्या नवे कलाकार टीव्हीवर अपेक्षित परिणाम दाखवू शकत नाहीत.

मराठीमध्येही जुन्या कलाकारांची मदत

मराठी मालिकांमध्येही सध्या ‘जय मल्हार’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ असे काही अपवादवगळता पूर्णपणे नव्या चेहऱ्यांच्या जोरावर अवलंबून असलेल्या मालिका तुरळकच आहेत. त्यातही त्यांना म्हणावे तसे यश नाही. ‘तू माझा सांगाती’, ‘कमला’, ‘माझं मन तुझे झाले’ या काही गाजलेल्या मालिकांमधून नवे चेहरे लोकांसमोर आले. पण त्यांच्यासोबत चिन्मय मांडलेकर, अशोक कोठारी, दीप्ती केतकर यांसारखे लोकप्रिय चेहरेही मालिकेत असतील यांची दक्षता निर्मात्यांनी घेतली आहे.

कलाकार निवडताना सर्वप्रथम व्यक्तिरेखेची गरज पाहिली जाते. नव्या मालिकेसोबत नवे चेहरे आणणे टीव्हीसाठी फायद्याचे असतात. पण लोकांमध्ये ते लोकप्रिय होण्यासाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो. तो वेळ सध्या वाहिन्यांकडे आणि निर्मात्यांकडे नाही. सततच्या स्पर्धेमुळे मालिका लवकर लोकप्रिय कशी होईल? याकडे त्यांचे लक्ष असते. जुन्या कलाकारांना त्यांची ओळख आणि प्रसिद्धी वलय असते. त्यामुळे प्रस्थापित चेहऱ्यांना घेऊन सध्या मालिका बनविल्या जात आहेत.

-गुरुदेव भल्ला, निर्माता (मालिका- उडाण)

Story img Loader