अभिनेते सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत दोन वर्षांमागे जुनी, यशस्वी नाटके मर्यादित २५ प्रयोगांसाठी ग्लॅमरस कलावंतांच्या संचात पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा विडा उचलला आणि (एका नाटकाचा अपवाद करता!) त्यांना मिळालेले घवघवीत यश पाहून जुनी, गाजलेली नाटके पुनरुज्जीवित करण्याची एक लाटच उसळली. अभिनेत्री नीलम शिर्के यांनीही ५० जुनी नाटके अशा तऱ्हेने रंगमंचावर आणण्याचा संकल्प सोडला. परंतु त्यांना मात्र अपेक्षित यश लाभले नाही. तथापि अन्य काही निर्मात्यांनीही या लाटेवर स्वार होत जुनी नाटके पुन्हा मंचित केली. अर्थात त्यांनाही संमिश्र यशच मिळाले. आजमितीला गेल्या वर्षभरात १५ ते १७ जुनी नाटके रंगमंचावर आली आहेत. मात्र, त्यापैकी ‘वस्त्रहरण’चा अपवाद करता तुफान यश एकालाही मिळालेले नाही. तरीही ही लाट येत्या वर्षांतही कायम राहील असा रागरंग आहे.
नव्या वर्षांची आशा
नव्या वर्षांतील दोन-तीन महिन्यांचा काळ हा विविध नाटय़स्पर्धा, पुरस्कार सोहळे आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा असल्याने या वातावरणात आपले नवे नाटक तरून जाईल, या आशेवर डिसेंबर महिन्यामध्ये अचानक १७-१८ नाटकांच्या भल्यामोठय़ा जाहिराती वर्तमानपत्रांतून झळकल्या आहेत. त्यात जशी विनोदी नाटके आहेत तशीच गंभीर नाटकेही आहेत. शफाअत खान- प्रियदर्शन जाधव यांचे ‘गांधी आडवा येतो’, ‘धर्म प्रायव्हेट लिमिटेड’, अंबर हडप यांचे त्यांच्याच एकांकिकेवरून केलेले पूर्ण लांबीचे नाटक- ‘बंदे में था दम’, संजय कृष्णाजी पाटील यांचे ‘मायलेकी’, अद्वैत दादरकर-विजय केंकरे जोडीचे ‘फॅमिली ड्रामा’, चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘बेचकी’, शरद पोंक्षे दिग्दर्शित ‘एका क्षणात’, अशोक पाटोळे-विजय केंकरे यांचे ‘दुर्गाबाई जरा जपून’, प्र. ल. मयेकर-अविनाश नारकर यांचे पुनरुज्जीवित ‘तक्षकयाग’, सुरेश चिखले-राजन ताम्हाणे यांचे ‘प्रपोजल’, ‘लव इन रिलेशनशिप’ (रंगावृत्ती : आनंद म्हसवेकर), ‘टाइम प्लीज’ (हृषिकेश परांजपे- अरुण नलावडे) या नाटकांकडून वेगळा आशय, वेगळी मांडणी आणि वेगळ्या सादरीकरणाच्या अपेक्षा आहेत.
ट्रेण्ड तोच!
जुन्या नाटकांची पूर्वपुण्याई आणि त्यातल्या नव्या, ग्लॅमरस कलावंतांमुळे अगदी ‘बम्पर’ जरी नाही, तरीही निर्मात्याचे ‘रेशनपाणी’ चालण्याइतपत गल्ला त्यांतून निश्चितपणे मिळत असावा. या हमीमुळेच ‘वस्त्रहरण’, ‘लग्नाची बेडी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘लेकुरे उदंड जालीं’, ‘जांभूळआख्यान’, हर्बेरियममधील ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’ (पूर्वीचे ‘आम्ही आलो रे’), ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ (एकपात्री), ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ इत्यादी अनेक नाटके पुनश्च रंगमंचावर अवतरताना दिसताहेत. येत्या वर्षांतही हा ट्रेण्ड सुरूच राहील अशी चिन्हे आहेत. किमान का होईना, ‘यशाची शक्यता’ हाच या नाटकांच्या निर्मितीमागचा निर्मात्यांचा निकष आहे.