मराठी रंगभूमीवर जुनी विनोदी नाटके नव्या संचात सादर होत असून यामुळे अगोदरच्या पिढीतील प्रेक्षकांना स्मरणरंजन आणि पुनप्र्रत्ययाचा तर नव्या पिढीला ‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या येत आहे.
काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर विनोदी आणि फार्सिकल नाटकांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी भाषेतील नाटकांनीही मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला. बबन प्रभू, आत्माराम भेडे, राजा गोसावी, शरद तळवलकर, किशोर प्रधान, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर आणि अन्य अभिनेत्यांनी रंगभूमीवर आपला स्वत:चा असा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. पु. ल.नीही एकपात्री प्रयोगातून विनोद या प्रकारात स्वतंत्र ठसा उमटविला आहे. दोन ते तीन तास निव्वळ करमणूक आणि हसवणूक असे स्वरूप असलेल्या नाटकांना प्रेक्षकानीही भरभरून प्रतिसाद दिला आहे.
दिलीप प्रभावळकर, अविनाश खर्शीकर, अरुण नलावडे, अतुल परचुरे आदींनी गाजविलेले ‘वासूची सासू’ पुन्हा नव्या संचात रंगभूमीवर सादर झाले आहे. यात प्रभावळकर आणि खर्शीकर यांच्या भूमिका अनुक्रमे प्रणव रावराणे आणि विक्रम गायकवाड (उंच माझा झोका प्रसिद्ध) हे करत आहेत. दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले ‘हसवा फसवी’ या नाटकाचेही प्रयोग सध्या सुरू असून प्रभावळकर यांनी साकारलेल्या या भूमिकांचे आव्हान आता अभिनेता पुष्कर श्रोत्री याने स्वीकारले आहे.
काही वर्षांपूर्वी बबन प्रभू यांनी गाजविलेले ‘घोळात घोळ’ हे फार्सिकल नाटकही नव्या संचात सध्या सुरू आहे. या नाटकात रमेश भाटकर व संजय नार्वेकर हे आघाडीचे कलावंत काम करत आहेत. शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुन्हा नव्याने रंगभूमीवर सादर होत आहेत. आनंद इंगळे, सुनील बर्वे, वैभव मांगले, भालचंद्र कदम, विद्याधर जोशी, संदीप पाठक आणि महेश वामन मांजरेकर असे कलाकार यात आहेत. हे नाटक यापूर्वी रंगभूमीवर येऊन गेले आहे.
सुनील बर्वे याने जुनी नाटके नव्या संचात आणण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. गेल्या पिढीतील प्रेक्षकांबरोबरच आत्ताच्या तरुण पिढीनेही या सर्व नाटकांना चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतरही अनेक जुनी नाटके रंगभूमीवर नव्याने सादर झाली आणि येणाऱ्या काळातही सामाजिक आशय असणारी, गंभीर तसेच विनोदी नाटकेही पुन्हा नव्याने सादर होणार आहेत.
प्रभावळकरांची दोन नाटके एकाच वेळी
अभिनयातील ‘चौकट राजा’ असलेले दिलीप प्रभावळकर यांनी गाजविलेली ‘वासुची सासू’ आणि ‘हसवा फसवी’ ही दोन नाटके नव्या संचात सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. एकाच अभिनेत्याची गाजलेली दोन जुनी नाटके नव्याने रंगभूमीवर एकाच वेळी सादर होण्याचा दुर्मिळ योग या निमित्ताने जुळून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा