‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ अशा विचित्र नावाच्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी यांनी साधली आहे. ‘सुरुवातीला मलाही हे नाव विचित्रच वाटले होते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. एका तारखेला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तर दुसऱ्या तारखेने लोकशाही राजवट दिली. मात्र, या दोन्ही घटनांनंतरही सर्वसामान्य भारतीयाच्या आयुष्यात जमा काय झाले आणि बाकी काय उरले याचा शोध घेणारा हा चित्रपट असल्याने मला तो करावासा वाटला’, असे ओम पुरी यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
हिंदी आणि कित्येक इंग्रजी चित्रपटांमधून ओम पुरी यांनी काम केले आहे. मग इतकी वर्षे मुंबईत राहूनही मराठी चित्रपटांपासून ते दूर कसे राहिले? या प्रश्नावर मराठी चित्रपटांविषयी मला कित्येक वेळा विचारणा झाली आहे. खूप चांगले मराठी चित्रपट माझ्याकडे आले होते. पण, मला मराठी भाषा चांगली येत नाही.
तुमचे जर भाषेवर प्रभुत्व नसेल तर काम करण्यात मजा येत नाही. त्यामुळे मी मराठीपासून दूर होतो, असे ओम पुरी यांनी सांगितले. ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ हा पितांबर काळे या तरुण दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. पितांबरने आधी खूप काम केलेले आहे. त्याची पटकथा वाचल्यावर ती मला खूप आवडली. पण, मी मराठी बोलू शकणार नाही, हे मी आधीच त्याला स्पष्ट केले, असे ते म्हणतात. या चित्रपटात ओम पुरी उत्तर भारतीय राजकारणी नेत्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे हिंदी-मराठी असे मिश्र भाषेत संवाद असल्याने त्यातल्या त्यात भाषेची अडचण थोडी सोपी झाली, असे त्यांनी सांगितले.
हिंदीत कित्येक चित्रपटांमधून ओम पुरी यांनी राजकारणी नेत्याच्या भूमिका केल्या आहेत. पण, या चित्रपटातला जो नेता आहे तो हिंदीतील एका साच्यातल्या गुंडांना घेऊन मारपीट करणारा किंवा स्वत:च बंदूक हातात धरून गोळ्या वगैरे घालणारा नाही. तो खूप वास्तवाच्या जवळ जाणारा आहे. राजकारणी वास्तव आयुष्यात एकमेकांना जो शह-काटशह देत असतात त्याप्रमाणे ही व्यक्तिरेखा रंगवण्यात आली असल्याचे ओम पुरी यांनी सांगितले. त्यांनी या चित्रपटाचे पटकथाकार आबा गायकवाड यांचा आवर्जून उल्लेख करत अतिशय सरळ आणि प्रभावी असे संवाद लिहिल्याबद्दल त्यांचे कौतुक के ले.
सध्या आठ ते दहा खूप चांगले तरुण दिग्दर्शक इंडस्ट्रीत आहेत पण, त्यातील बरेच जण शहरी कथांमध्ये अडकून पडले असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी या देशातल्या खेडोपाडय़ांमध्ये पोहोचले पाहिजे, तिथल्या कथा चित्रपट माध्यमातून लोकांसमोर आल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात यश मिळाले तर आणखी मराठी चित्रपट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.