मराठीत महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लोकमान्य’ चित्रपटाशी ओम पुरी साकारत असलेल्या भूमिकेचा काहीही संबंध नाही. हिंदीत चाफेकर बंधूंवर एक चित्रपट येतो आहे आणि त्यात ज्येष्ठ अभिनेता ओम पुरी हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची भूमिका साकारणार आहेत. ओम पुरी यांनी अनेक चांगल्या भूमिका आजवर केल्या आहेत. मात्र त्यांना लोकमान्यांच्या भूमिकेत पाहणे नक्कीच वेगळे ठरणार आहे.
‘चाफेकर ब्रदर्स’ नामक हिंदी चित्रपटात ओम पुरी हे बाळ गंगाधर टिळक यांची भूमिका करणार असून ही भूमिका करायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘लोकमान्य टिळक यांच्यासारख्या थोर नेत्याची भूमिका करायला मिळणे ही नक्कीच भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या संशोधनातून टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू शोधतो आहे. टिळकांवर इतके विपुल लेखन उपलब्ध आहे की त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या गोष्टींची निवड करण्याचे काम एक अभिनेता म्हणून मी करतो आहे’, असे ओम पुरी यांनी सांगितले.
‘चाफेकर ब्रदर्स’ या चित्रपटाची निर्मिती ‘गिरीवा प्रॉडक्शनचे’ घनश्याम पटेल यांनी केली असून दिग्दर्शन मिलन अजमेरा यांचे आहे. स्वातंत्र्यलढय़ातील चाफेकर बंधूंचे योगदान, त्यांचा जीवनप्रवास आणि रँडची हत्या असे कथानक या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा धीरज मिश्रा यांनी लिहिली असून गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येत आहे. रुपेरी पडद्यावर लोकमान्यांची व्यक्तिरेखा साकारणे हे खचितच सोपे नाही, याची जाणीव ओम पुरी यांनी आहे. मात्र चित्रपटाची टीम इतकी चांगली असून त्यांनी पुरेसे संदर्भ, संशोधन अभ्यास केला आहे. चित्रपटाची पटकथाही उत्तम जमली असून या सगळ्याच्या जोरावर टिळकांची भूमिका आपण चांगली वठवू शकू, असा विश्वास ओम पुरी यांनी व्यक्त केला.

Story img Loader