भारतात सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कपिलचा आज २ एप्रिल रोजी ४० वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चे सूत्रसंचालन करत अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा कपिलकडे घर चालवायला पैसे सुद्धा नव्हते.
कपिलचा जन्म १९८१ साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील पोलीस होते. २००४ मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. परिणामी मित्रांसोबत खेळण्याच्या वयात वडीलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी कपिलवर आली होती. वडील पंजाब पोलिसमध्ये सब इन्स्पेक्टर होते. त्यामुळे कपिलला त्यांच्या जागेवर काम करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र कपिलने त्याला नकार दिला.
आता कुटुंबाची जबाबदारी आल्याने कपिलने एका PCO वर काम करायला सुरूवात केली. वडीलांच्या निधनानंतर त्याने बरेच दिवस PCO वर काम करुण कुटुंबाचे पालण-पोषण केले. यासगळ्यात कपिलचे स्वप्न ही हरवल्या सारखे झाले होते. कपिल गाणं चांगल गायचा पण त्याला कधी संधी मिळाली नाही. कॉमेडी पण बऱ्यापैकी करायचा. पण, त्याचा बराच वेळ हा संधी शोधण्यात गेला.
२००८ मध्ये कपिलने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये भाग घेतला. या शोचा तो विजेता ही ठरला आणि तिथुन त्याच्या करिअरला खरी गती मिळाली. कपिलने कॉमेडीला करिअर म्हणून निवडण्याचे ठरवले. त्याने त्याच्या विनोदांवर काम करायला सुरूवात केली, आणि यामुळेच कपिलने ६ वेळा ‘कॉमेडी नाईट्स’चे विजेतपद आपल्या नावावर केले. कपिलचा हा रेकॉर्ड आता पर्यंत कोणी तोडू शकलं नाही.
त्यानंतर सोनी वाहिनीने त्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो होस्ट करण्याची संधी दिली. कपिलच्या अनोख्या विनोदी शैलीमुळं हा शो सुपरहिट ठरला, सोबतच कपिलदेखील सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याला काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे कधीकाळी PCO वर काम करणारा कपिल सुपरस्टार विनोदवीर झाला.