दिलीप ठाकूर
‘येथे नायक-नायिकेवर चिंब पावसात भिजतानाचे गाणे’ असे पटकथेनुसार येताच त्यापुढे दृश्रासाठीची प्रॉपर्टी म्हणून खरं तर छत्री, रेनकोट असे लिहायला हवे. पण ती जागा कोरीच ठेवणे हीच आपल्या चित्रपटाची संस्कृती आहे. याचे कारण तुम्हालाही माहित्येय की, असे मुसळधार पावसातले गाणे म्हणजे नायक-नायिकेला भिजवून टाकण्याची हुकमी रुपेरी संधी. कृष्ण-धवल अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटांपासून हा ओलावा कायम आहे. यात हेतू एकच. प्रामुख्याने नायिकेचे शरीरसौंदर्य खुलविणे. मुमताजपासून (दो रास्ते, अपना देश, रोटी इत्यादी) प्रियांका चोप्रापर्यंत (बरसात) ही ओलाव्याची परंपरा कायम पुढे चाललीय. पावसातील सर्वोत्तम गाणे ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ (मिस्टर इंडिया) हेच असे मानणारे खूप रसिक आहेत. श्रीदेवी यात चिंब.. चिंब.. चिंब.. होऊन नाचतानाच प्रियकराच्या (अनिल कपूर) स्पर्शाची जाणीव देते. नृत्यात अभिनय असतोच याचा प्रत्यय या ओल्या गाण्यात येतोच. तर सकस अभिनयासाठीच ओळखली गेलेल्या स्मिता पाटीलनेही अमिताभ बच्चनसोबत ‘आज रपट जायें तो हमें न उठइयो…’ (नमक हलाल) गाण्यातील धुवाधार पावसात भिजत मसालेदार मनोरंजक व्यावसायिक गोष्टीत रंगत आणली.

सेटवर अथवा बाह्यचित्रीकरण स्थळी पाऊस गाणे असेल आणि कॅमेऱ्यासमोर छत्री-रेनकोट नसला तरी कॅमेऱ्यावर मात्र मोठ्ठी छत्री असावी लागतेच. शूटिंगसाठीचा हा खोटा पाऊस तांत्रिक बिघाडास कारणीभूत ठरु नये याची काळजी घ्यावीच लागते. स्टारदेखिल दिग्दर्शक कट म्हणताच स्पॉटबॉयकडून मोठ्ठा टॉवेल ओढून घेतात आणि केस, अंग व कपडे सुकवायची गती वाढवण्यासाठी भल्या मोठ्या पंख्यासमोर उभे राहतात. पॅकअप असा शब्द कानावर पडताच घरी जाताच स्टीम बाथ घेतात. तात्पर्य, पडद्यावर ‘पाऊस गाणी’ ‘हिट अॅण्ड हॉट’ ठरत असली तरी त्याचे शूटिंग मात्र असंख्य कटकटींनी भरलेले असते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पावसाच्या गाण्यात छत्री, रेनकोट वापरायलाच हवा हाच वास्तववाद आहे असे कोणी चित्रपट समिक्षक म्हणत नाहीत यावरुन हे सगळेच चित्रपट मनोरंजक बनण्यासाठीच तर आहे हेच अधोरेखित होते. तरीही काही गाण्यात छत्री आहे असे म्हणताच आजच्याही पिढीला साठच्या दशकातील ‘श्री ४२०’मधील ‘प्यार हुआ, इकरार हुआ है’ गाण्यातील एकाच छत्रीतील राज कपूर व नर्गिस आठवले असतीलच. या गाण्यातच बालपणीचे रणधीर, ऋषि हे कपूरपुत्र रेनकोटमध्ये दिसतात. पण काही म्हणा एकाच छत्रीत पावसापासून बचाव करण्याचा हे प्रेमी युगुल प्रयत्न करते, हे जास्तच रोमॅन्टिक व रोमांचक आहे. येथे दिग्दर्शक दिसतो असे राज कपूरबद्दल कौतुकाने म्हणायला हवेच. याच गाण्याचे रिमिक्स अवतार सातत्याने येत राहिल्याने हे मूळ गाणे पुढील पिढीत जात राहिले. उदा. ‘पत्थर कें फूल’, ‘दिल चाहता हैं’, ‘रबने बनादी जोडी’ इत्यादी.

एकाच छत्रीखालील नायक व नायिका अशाही गाण्यांची झक्कास वाटचाल आहे. ‘काला बाजार’च्या ‘रिमझिम के तराने लेके आई बरसात’ (देव आनंद व वहिदा रेहमान) ते ‘थ्री इडियट्स’च्या ‘झुबी डूबी’ (आमिर खान व करिना कपूर) पर्यंत सुरु आहेच. ‘चालबाज’मधील ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की…’ गाण्यातील रेनकोट आणि छत्रीत छान नृत्य करणारी श्रीदेवी आठवायला हवीच. तर ‘दो झूठ’मध्ये असाच अचानक पाऊस येताच प्रियकर (विनोद मेहरा) प्रेयसीला (मौशमी चटर्जी) छत्री उघडायचा आग्रह करतो तेव्हा ती तसे करु देत नाही. कारण त्यात तिने आपल्या म्हाताऱ्या रुपातील कपडे, चष्मा वगैरे लपवलेले असते. ‘छत्री ना खोल उड जाऐगी’ असे लगेचच गाणे सुरु होते.

छत्री वा रेनकोट नसणे कधी वेगळ्या संदर्भात आलेय. ‘मेला’ चित्रपटात लहानपणी दोघे सख्खे भाऊ दंडावर नोंदवून घेत असतानाच प्रचंड वादळ वाऱ्यासह पाऊस येताच सगळीकडे पळापळ होते. कोण कुठे पळतो हेच समजत नाही व हे भाऊ हरवतात. आणि मोठेपणी चित्रपटाच्या क्लायमॅक्सला जत्रेतील त्या खूणेवरुन आपण सख्खे भाऊ (फिरोज व संजय खान) असल्याचे ते ओळखतात. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सच्चा झूठा’मध्ये यापेक्षाही मोठा पाऊस येतो. गावातील नदीच वाहून जाते व त्यात भाऊ व बहिण दुरावतात. कालांतराने मुंबईत ते ‘मेरी प्यारी बहेनीया’ गाण्याने (राजेश खन्ना व नाझ) भेटतात.

रहस्यपटात छत्री, रेनकोट हमखास वापरला जातोय हे ‘खेल खेल में’, फिर वही रात’ अशा अनेक चित्रपटातून दिसतेय. कधी मारहाण दृश्यात अनेक छत्रीधारी दिसले (सनी देओलचा ‘अर्जुन’), तर कधी एकटा ‘काला’ (रजनीकांत) मोठ्याच छत्रीने एकाच वेळेस अनेकांना भारी पडलाय. ‘छत्री’ नावाची मालिका सुरु होईपर्यंत ही वाटचाल सुरु राहिलीय.

तसं पाहता, बाह्यचित्रीकरणप्रसंगी चित्रपटाच्या सेटवर बाराही महिने कलरफुल छत्री असतेच. कारण उन्हापासून स्टारला आपले सौंदर्य व त्वचा वाचवायची असते. उन्हाने मेकअप उतरायची भीती असते तशीच भीती खऱ्या अथवा फिल्मी पावसानेही मेकअप खराब होण्याची शक्यता असतेच. तो सांभाळणे जास्तच गरजेचे असल्यानेच या क्षेत्रातील छत्रीचे महत्त्व अधोरेखित होतेच. पाऊस, छत्री आणि रेनकोटचे मनोरंजनाच्या क्षेत्रातील हे असे समिकरण.

Story img Loader