छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या मालिकेने काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला आहे. काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता. याच निमित्ताने मालिकेतील गुरूनाथ (गॅरी) म्हणजेच अभिजीत खांडेकर याची खरी पत्नी सुखदा खांडेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुखदाने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुखदाने अभिजीतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा शेवटचा भाग हा आज प्रसारित होणार आहे. अभि…साडे चार वर्ष आणि १३७५ पेक्षा जास्त भाग…मला तुझा अभिमान आहे. तुझं कामाप्रति समर्पण, प्रक्रियेवरील तुझा विश्वास आणि सातत्य हे अकल्पनीय आहे. आम्हाला हा प्रेमळ गुरूनाथ / गॅरी दिल्याबद्दल धन्यवाद .. ही भूमिका तुझ्या शिवाय कोणीच एवढ्या चांगल्या प्रकारे फूलवू शकलं नसतं. त्याची नेहमीच आठवणं येईल.” अशा आशयाचे कॅप्शन सुखदाने दिले आहे.
View this post on Instagram
या मालिकेचा पहिला भाग हा २२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झाला होता. तेव्हा पासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुरूवातीच्या काळात ही मालिका टीआरपीमध्ये ही नंबर एकला होती. या मालिकेला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांमध्ये मालिकेने तिचा ट्रॅक बदलला म्हणून प्रेक्षक नाराज झाले होते. त्यांमुळेच निर्मात्यांनी ही मालिका संपवण्याचा निर्णय घेतला.