‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक आहे. एवढंच नाहीतर मालिकवरील मीम्स तर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. त्यात या मालिकेतील अभिजीत राजे, आसावरी, शुभ्रा आणि खास करुन बबड्या हे पात्र प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. आई आणि बबड्या यांच्या अनोख्या जुगलबंदीचे भन्नाट मीम्स तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. पण आता ही मालिका सगळ्यांचा निरोप घेते आणि तिच्या जागेवर या मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गंबाई सुनबाई’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा निरोप घेताना बबड्याची भूमिका साकारणारा आशुतोष पत्कीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
आशुतोषने त्याच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो आहे. या फोटोमध्ये त्याचे सहकलाकार दिसत आहेत. “Farewell it is !! “सोहम” ऊर्फ “बबड्या”… काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम १ नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण “अग्गंबाई सासूबाई”मुळे बरचं काही शिकायला मिळालं मराठी भाषेपासून, कलाकाराने कॅमेरासमोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं… सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो, सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं या साठी मी आभारी आहे” असे आशुतोष म्हणाला.
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, झी मराठी आणि आमचे निर्माता यांचा मी आभारी आहे की “सोहम” म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ..आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक तुम्ही सुद्धा खूप प्रेम दिलत. हे पाहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय… खूप आठवण येईल सगळ्यांची पण “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”… लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करीन तुमच्या मनात घर करण्याचा..”अग्गंबाई सूनबाई” च्या संपुर्ण टीमचा खूप शुभेच्छा.” असे कॅप्शन आशुतोषने दिले आहे.
दरम्यान, ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेच्या दुसऱ्या भाग म्हणजे ‘अग्गंबाई सुनाबाई’ या मालिकेत सोहमची भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर साकारणार आहे.