‘केजीएफ’च्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटाने गेल्या वर्षी रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर या चित्रपटाचा तिसरा भाग कधी प्रदर्शित होणार याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अखेर काल ‘केजीएफ-३’चा अनाउन्समेंट टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
१४ एप्रिल २०२२ रोजी ‘केजीएफ २’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तर काल हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष झालं. याच निमित्त आनंद व्यक्त करत या चित्रपटाच्या टीमने एक खास टीझर पोस्ट केला. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात असलेली ‘केजीएफ ३’ची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
‘केजीएफ २’चा पोस्ट क्रेडिट सीन पाहून या चित्रपटाची टीम ‘केजीएफ ३’च्या तयारीत आहे असं समोर आलंच होतं. पण या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून या चित्रपटात पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते. पण काल प्रदर्शित झालेल्या दोन मिनिटांच्या टीझरमुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कथा एक वेगळंच वळण घेणार आहे हे स्पष्ट झालं. १९७८ ते १९८१ या वर्षांच्या कालावधीत रॉकी कुठे होता? आणि काय करत होता हे रहस्य ‘केजीएफ ३’मधून उलगडणार आहे, असं या टीझर पाहिल्यावर समजतं. हा टीझर पोस्ट करत निर्मात्यांनी लिहिलं, “सर्वात शक्तिशाली माणसाने पाळलेलं शक्तिशाली वचन…”
हा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी याला तुफान प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत सर्वजण ‘केजीएफ ३’साठी प्रचंड उत्सुक असल्याचं सांगत आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा साउथ सुपरस्टार यश दमदार अंदाजात दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.