मुंबई : साठ – सत्तरच्या दशकांत हिंदी – मराठी चित्रपट, नाटय़सृष्टीत पटकथाकार, गीतकार, लेखक, निर्माता म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधत त्यांच्या नावाने निर्मिती संस्था सुरू करण्यात येणार आहे. ‘मधुसुदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची घोषणा करण्यात आली असून या संस्थेंतर्गत नवनवीन चित्रपट, वेबमालिकांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कालेलकरांनी पटकथा लेखन केलेल्या काही गाजलेल्या हिंदी – मराठी चित्रपटांच्या सिक्वेलसाठी नामांकित स्टुडिओशी चर्चा सुरू असल्याची माहिती निर्मात्या गौरी कालेलकर चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मराठी – हिंदीत शंभरहून अधिक चित्रपटांसाठी पटकथा लेखन, ३३ नाटकांचे लेखन – निर्मिती, ७० हून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केलेल्या मधुसुदन कालेलकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र प्रसिद्ध पटकथाकार अनिल कालेलकर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आता त्यांची तिसरी पिढी कलेचा हा वारसा निर्मिती संस्थेच्या माध्यमातून पुढे नेऊ पाहते आहे. कालेलकर यांची नात गौरी कालेलकर चौधरी यांनी या निर्मिती संस्थेसाठी पुढाकार घेतला असून नुकत्याच झालेल्या एका समारंभात ‘मधुसुदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची घोषणा करण्यात आली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्या उपस्थितीत या निर्मिती संस्थेच्या घोषणेबरोबरच लोगोचेही अनावरण करण्यात आले. कालेलकरांनी लिहिलेल्या चित्रपट-नाटकांच्या कथा-पटकथा, त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध गाणी असे अभिजात, अमूल्य साहित्य आमच्याकडे आहे. त्यांचे काही चित्रपट वा नाटक यावर पुन्हा काम करून ते प्रेक्षकांसमोर आणावे, असा विचार गेली कित्येक वर्षे मनात घोळत होता. स्वतंत्रपणे आम्ही काही कलाकृतींची निर्मितीही केली. सहनिर्माती म्हणून ‘घरत गणपती’ या नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा स्वतंत्रपणे कालेलकर यांच्या नावाने निर्मिती संस्था सुरू करून हा कलेचा वारसा अधिक समर्थपणे पुढे नेता येईल, असा विश्वास वाटला आणि या संस्थेची घोषणा केली, असे यानिमित्ताने ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना गौरी कालेलकर चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला

कालेलकरांचे लेखन विविधांगी होते. त्या काळात एकीकडे त्यांनी लिहिलेले ‘फरार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ यांसारखे हिंदी चित्रपट  रौप्य महोत्सव साजरा करत होते. त्यावेळी ते ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाच्या लेखनासाठी आवश्यक असलेले सावरकरांचे लेखन, त्याच्याशी निगडित संदर्भग्रंथ गोळा करण्यात मग्न होते. हिंदी-मराठी असे भाषेचे कुठलेही बंधन न मानता एकाच वेळी चित्रपट-नाटक आणि गीतलेखन अशा विविध माध्यमांतून सकस साहित्यलेखनात रमलेला त्यांच्यासारखा कलाकार नाही. त्यांचे कार्य, साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटुंबिक नाटय़ असलेल्या साहित्यावर त्यांचा भर अधिक होता, त्यामुळे सहनिर्मितीच्या पहिल्याच प्रयत्नात ‘घरत गणपती’सारखा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट केला. ‘मधुसुदन कालेलकर प्रॉडक्शन’ची स्वतंत्र निर्मिती असलेल्या चित्रपटाचेही काम सुरू झाले असून पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे गौरी कालेलकर चौधरी यांनी सांगितले.