जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’ हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर येत असून नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात कोथरूड येथील यशवंत नाटय़गृहात सादर होणार आहे. अभिनेते शैलेश दातार, त्यांची पत्नी सुहास, अभिनेते विघ्नेश जोशी यांच्या पुढाकाराने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे.
नाटकाचा विषय/ पाश्र्वभूमी ही सुमारे शंभर वर्षांपूर्वीची असली तरीही स्त्रीयांच्या प्रश्नाबाबत आजच्या काळातही वेगळ्या संदर्भात विचार करायला लावणारे हे नाटक आहे. मानवी मनाचा गुंता उकलणारे आणि नाटकातील विविध पात्रांच्या मनाचा मानसशास्त्रीय पद्धतीने वेध घेणाऱ्या या नाटकात एक धगधगते वास्तव प्रेक्षकांपुढे उलगडते. सुजाण प्रेक्षकांच्या मनाला आजच्या काळातही हे नाटक भीडू शकते हे विचारात घेऊन आम्ही ‘बॅरिस्टर’ पुन्हा करण्याचे ठरविले असल्याचे या नाटकातील ‘बॅरिस्टर’ची मुख्य भूमिका करणारे शैलेश दातार यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
आधि गोवा हिंदू असोसिएशनने १९७७ मध्ये पहिल्यांदा हे नाटक रंगभूमीवर सादर केले. विजया मेहता यांचे दिग्दर्शन व नाटकातही एक प्रमुख भूमिका, विक्रम गोखले ‘बॅरिस्टर’च्या मुख्य भूमिकेत आणि अन्य सहकलाकार यात होते. अनेक वर्षे हे नाटक सुरु होते. अलिकडेच हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले, त्यात मी ‘बॅरिस्टर’ची भूमिका केली होती. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन विक्रम गोखले यांनी केले होते आणि आता पुन्हा नव्याने सादर होणाऱ्या या नाटकाचे दिग्दर्शनही तेच करत आहेत. हे नाटक करणे म्हणजे आम्ही कलाकारांसाठी एक अभ्यास होता आणि आजही आहे. मी या नाटकात मुख्य भूमिका करत होतो, त्याचे काही प्रयोग झाल्यानंतर नाटक बंद पडले. हे एक ‘क्लासिक’ नाटक असून प्रत्येक नव्या पिढीपर्यंत हे नाटक पोहोचले पाहिजे. अन्य कोणी हे नाटक करण्यासाठी पुढे येत नसेल तर आपण का करू नये, या उद्देशाने आम्ही हे नाटक पुन्हा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही दातार यांनी दिली.
नाटकातून पैसे कमाविणे हा आमचा उद्देश नाही. एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगाचा खर्च निघाला तरी आमच्यासाठी ती समाधानाची व आनंदाची बाब आहे. शक्य होतील तसे सुजाण प्रेक्षकापुढे नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. एकेका माणसाच्या दु:खामागे काय काय कारणे असू शकतात, हे दळवी यांनी प्रभावीपणे या नाटकात मांडले आहे. मुळात नाटकाची संहिता अत्यंत ताकदवान असल्याचे सांगून दातार म्हणाले की, या नव्या प्रयोगात माझ्यासह इला भाटे, अद्वैत दादरकर, भक्ती देसाई, राम कोल्हटकर, वसंत इंगळे आदी कलाकार आहेत.
पुन्हा एकदा ‘बॅरिस्टर’
जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’ हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर येत असून नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात कोथरूड येथील यशवंत नाटय़गृहात सादर होणार आहे.
First published on: 18-10-2013 at 06:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again barister drama is releasing