आमिर खान आणि ‘सत्यमेव जयते’ हा शो यांच्यात एक हळवं नातं तयार झालं आहे. कारण अंतिमत: हा शो म्हणजे आमिरला सामान्यांशी, त्यांच्या जगण्याशी, त्यांच्या दु:खाशी आणि संघर्षांशी फार जवळून जोडून घेणारा दुवा आहे. आणि म्हणूनच मागे कधी तरी ‘सत्यमेव जयते’चे चित्रीकरण सुरू असताना मी नेहमी हळवा होतो आणि रडायला लागतो. मग चित्रीकरण थांबतं, पुन्हा ते सुरू होतं.. असं आमिरने सांगितलं होतं. पण ‘सत्यमेव जयते’च्या बाबतीतला आमिरचा हळवेपणा इतका खोल आहे की, स्वत:च्याच शोचे भाग नुसते पाहतानाही त्या आठवणींनी त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला सुरुवात होते..
‘सत्यमेव जयते’च्या या वर्षांतील तिसऱ्या आणि अंतिम पर्वाची घोषणा करण्यासाठी आमिरने एक छोटेखानी सोहळा आयोजित केला होता. नव्या पर्वाविषयी बोलण्याआधी मागच्या पर्वातील काही भाग, ज्या समस्या या शोच्या माध्यमातून मांडण्यात आल्या होत्या त्यांचे आत्ताचे स्वरूप, त्यांच्या उपाययोजनांचे काय झाले, याचा आढावा या भागांमध्ये घेण्यात आला होता. याच शोच्या वेळी घेतलेल्या काही मुलाखती पाहताना आमिरला आपल्या भावना अनावर झाल्या..
‘सत्यमेव जयते’ या शोशी असलेले आपले नातेच वेगळे आहे, असे आमिर म्हणतो. या शोचे तिसरे पर्व २१ सप्टेंबरपासून दाखवले जाणार आहे. या वेळी शोच्या स्वरूपात काही वेगळे बदल करण्यात आल्याची माहिती आमिरने या वेळी बोलताना दिली. या शोमध्ये आमिर काही लोकांशी खुद्द संवाद साधणार आहे. शिवाय, काही सेलिब्रिटी कलाकारही या शोमध्ये खास हजेरी लावणार असून त्या त्या समस्यांविषयीच्या चर्चामध्ये ते सहभागी होणार असल्याचेही त्याने सांगितले. मात्र हे कलाकार कोण आहेत हे सांगण्यास त्याने नकार दिला. शोमध्ये जे कलाकार सहभागी होतील ते ‘सत्यमेव जयते’च्या किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या प्रसिद्धीसाठी सहभागी होणार नाहीत. त्यामुळे त्यांची नावे आपण सांगणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘सत्यमेव जयते’चे भाग पाहताना किंचितशा हळव्या झालेल्या आमिरने या वेळीही ‘मुमकिन है..’चा पुनरुच्चार केला. बदल घडू शकतात. ते तुमच्या आणि माझ्या माध्यमातून घडू शकतात, असा विश्वास त्याने पुन्हा एकदा व्यक्त केला.
‘सत्यमेव जयते’ पाहिल्यानंतर कोणी माझे चित्रपट पाहणार नाहीत..
प्रत्येक गोष्टीच्या वेळा मला सांभाळाव्या लागतात. माझ्यावर सामाजिक जबाबदारी लोकांनी टाकलेली आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ पाहिल्यानंतर लोकांना माझे चित्रपटातील काम पाहण्यात रसच उरत नाही, असे आमिरने सांगितले. मागे ‘पी. के.’ चित्रपटासाठी लोकांशी संवाद साधताना त्यांनी ‘सत्यमेव जयते’च्याच विषयांवरून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. त्यामुळे माझ्या चित्रपटांपेक्षा हा शो लोकांच्या मनात जास्त घर करून राहिला आहे, असे त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा