क्रूजवरून तीन सुंदर देशांची सफर घडवीत, मराठीतील ग्लॅमरस चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला वन वे तिकीट हा सिनेमा येत्या २३ सप्टेंबरपासून मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला. ‘व्हिडीओ पॅलेस’ व ‘मेकब्रॅंड प्रस्तुत’ या सिनेमाची निर्मिती कोमल उनावणे यांनी केली असून दिग्दर्शन कमल नथानी व अमोल शेटगे यांनी केलंय.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील तरुणाईला रिफ्रेश करणारं झालंय. अश्विनी शेंडे, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना गौरव डगांवकर यांनी संगीतबद्ध केलं आहे, तर पार्श्वसंगीत ट्रॅाय आरीफ यांचं आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातलं ‘बेफिकर’ हे रोमँटिक गीत रोहित राऊत व श्रीनिधी घटाटे यांनी गायलं असून ‘रेश्मी रेश्मी’ हे दुसरं गीत आनंदी जोशी व गौरव डगांवकर यांच्या गायकीने खुललं आहे. इतर गीतांना सावनी रवींद्र, क्षितीज वाघ, अरुणिमा भट्टाचार्य, शीफा हरीस यांचा स्वरसाज लाभला आहे. खिळवून ठेवणारी कथा, नयनरम्य लोकेशन्स व सुरेल गीतांमुळे वन वे तिकीट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने यावेळी व्यक्त केला. युवा निर्मात्या कोमल उनावणे यांनी पहिल्या चित्रपट निर्मितीत अनेक गोष्टी जुळवून आणीत दर्जेदार चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे सह निर्माते ‘क्लिक फिल्क फिल्मस’ व सुरेश पै आहेत.
वन वे तिकीट या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, नेहा महाजन असे मराठीतील ग्लॅमरस चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. सोबत आशा शेलार, रॉजर डेकोस्टा यांच्याही भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा–पटकथा संवाद अमोल शेटगे यांचे आहे तर सहदिग्दर्शन महेश पावस्कर याचं आहे. रुपंग आचार्य यांनी छायांकनांची तर स्वप्नील टकले यांनी कलादिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संकलन आशिष म्हात्रे व अपूर्वा यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन राजीव व सुजीतकुमार यांचं आहे. वन वे तिकीटच्या ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळ्याचे प्रायोजक ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ व ‘पाँण्डस ड्रिमफ्लोवर’ हे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा